Sultan Kosen Divorce : जगातील सर्वात उंच व्यक्तीचा घटस्फोट!

उंची नव्हे तर 'हे' ठरले घटस्फोटाचे मुख्य कारण; तुर्कीयेच्या सुलतानने मांडली आपली व्यथा
Sultan Kosen Divorce
जगातील सर्वात उंच व्यक्तीचा घटस्फोट!
Published on: 
Updated on: 

इस्तंबुल : जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुल्तान कोसेनने २०१३ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, हे लग्न केवळ ८ वर्षे टिकले. नुकतेच तुर्कीयेचा रहिवासी असलेल्या सुल्तानने आपल्या घटस्फोटाचे कारण स्पष्ट केले असून, तो पुन्हा एकदा जोडीदाराच्या शोधात असल्याचे समोर आले आहे.

८ फूट २ इंच उंची असलेल्या सुल्तान कोसेनचा विवाह २०१३ मध्ये सिरियाच्या मर्वे दीबो हिच्याशी झाला होता. हा सोहळा एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भव्य होता. या लग्नाला १५०० हून अधिक पाहुणे उपस्थित होते, ज्यात ‌‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌’च्या प्रतिनिधींचाही समावेश होता. आपले स्वतःचे कुटुंब असावे आणि कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे, हे सुल्तानचे स्वप्न या लग्नामुळे पूर्ण झाले होते. लग्नानंतर काही काळ सुखाचा गेला, पण हळूहळू या नात्यात दुरावा निर्माण झाला. सुल्तानने दिलेल्या माहितीनुसार, या विरहाचे मुख्य कारण ‌‘भाषा‌’ हे होते. सुल्तान तुर्की भाषा बोलायचा, तर त्याची पत्नी मर्वे हिला केवळ अरबी भाषा अवगत होती. संवाद साधताना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांच्यातील दरी वाढत गेली आणि शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. भाषेव्यतिरिक्त, सुल्तानची असामान्य उंचीदेखील या नात्यासाठी एक आव्हान ठरली. सुल्तानचे दैनंदिन जीवन सामान्य लोकांपेक्षा वेगळे असते.

घरातील दरवाजे, बेड आणि फर्निचर हे सर्व त्याच्या उंचीनुसार बनवून घ्यावे लागते. या रोजच्या तांत्रिक अडचणींचाही त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. घटस्फोटानंतर सुल्तानने आपले दुःख व्यक्त केले. ‌‘मी आजही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे,‌’ असे त्याने सांगितले. या आशेने त्याने रशियाचा प्रवासही केला; परंतु अद्याप त्याला अपेक्षित जोडीदार मिळालेला नाही. सुल्तान कोसेनचे नाव ‌‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌’मध्ये जगातील सर्वात उंच जिवंत व्यक्ती म्हणून नोंदवले गेले आहे. त्याच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये ट्यूमर असल्याने त्याला ‌‘गिगेंटिझम‌’ची समस्या झाली होती, ज्यामुळे त्याची उंची असामान्यपणे वाढली. उपचारानंतर त्याची उंची वाढणे थांबले असले तरी, आज तो ८ फूट २ इंचांचा आहे. सध्या सुल्तान आपल्या गावात शेती करून जीवन जगत आहे. अनेक संघर्षांनंतरही त्याने आयुष्यात पुन्हा प्रेम मिळेल, अशी आशा सोडलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news