

मिलान/पॅरिस : वैद्यकीय विश्वातून एक अत्यंत आश्चर्यकारक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी एका अशा नवीन आणि दुर्मीळ रक्तगटाचा शोध लावला आहे, जो आजपर्यंत जगात केवळ एकाच व्यक्तीमध्ये आढळला आहे. फ्रान्सच्या ग्वाडेलूप बेटावर राहणार्या एका 68 वर्षीय महिलेच्या शरीरात हा अनोखा रक्तगट सापडला असून, या शोधाने संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांना चकित केले आहे.
या नवीन रक्तगटाला महिलेच्या मूळ बेटाच्या नावावरून ‘ग्वाडा निगेटिव्ह’ (Gwada negative) असे नाव देण्यात आले आहे. नुकत्याच इटलीतील मिलान शहरात पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन’च्या जागतिक परिषदेत या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा करण्यात आली. या महिलेव्यतिरिक्त जगात अन्य कोणामध्येही हा रक्तगट अस्तित्वात असल्याचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. एका दशकाहून अधिक काळ चाललेले रहस्य या प्रकरणाची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा ही महिला एका शस्त्रक्रियेसाठी पॅरिसमध्ये दाखल झाली होती. तिच्या रक्ताच्या नियमित चाचण्या सुरू असताना डॉक्टरांना तिचा रक्तगट कोणत्याही ज्ञात रक्तगटाशी जुळत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळच्या मर्यादित तंत्रज्ञानामुळे यामागचे कारण शोधणे शक्य झाले नाही आणि हे रहस्य जवळपास आठ वर्षे उलगडले नाही. 2019 मध्ये, शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक ‘हाय-थ्रुपुट जीन सिक्वेन्सिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून या महिलेच्या रक्ताचे पुन्हा विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांच्या अथक आणि सखोल संशोधनानंतर, तिच्या संपूर्ण जनुकीय आराखड्याचा (Genome) अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की, हा एक पूर्णपणे नवीन रक्तगट आहे.
आपण शाळेत शिकलेल्या A, B, O आणि AB रक्तगटांपलीकडेही मानवी रक्तगटांचे जग खूप गुंतागुंतीचे आहे. रक्तगट हे आपल्या लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट प्रथिने आणि शर्करा (Antigens) यावरून ठरतात. आपली रोगप्रतिकारशक्ती या प्रतिजनांना ओळखते. 1901 मध्ये डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी ABO रक्तगट प्रणालीचा शोध लावला होता, ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.‘ग्वाडा निगेटिव्ह’च्या या नवीन शोधामुळे मानवी रक्ताच्या विविधतेबद्दलच्या आपल्या ज्ञानात आणखी भर पडली असून, भविष्यात अशा संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.