Sargasso Sea | जगातला एकमेव समुद्र ज्याला कोणताही किनाराच नाही!

शास्त्रज्ञही अवाक्, कुठे गायब झाले याचे तट?
Sargasso Sea |
Sargasso Sea | जगातला एकमेव समुद्र ज्याला कोणताही किनाराच नाही!
Published on
Updated on

लंडन : या पृथ्वीवर एक असाही समुद्र आहे ज्याला कोणताही किनारा किंवा तटरेखा नाही, यावर तुमचा विश्वास बसेल का? ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून एक भौगोलिक सत्य आहे. अटलांटिक महासागराच्या अगदी मध्यभागी एक असा गूढ समुद्र आहे, ज्याला कोणतीही जमिनीची सीमा नाही. शतकानुशतके हा समुद्र शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी एक कोडे बनला आहे. येथे खलाशी हरवल्याच्या आणि जहाजे फसण्याच्या अनेक भीतीदायक कथाही प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया या अनोख्या समुद्राचे सत्य.

या अनोख्या समुद्राचे नाव आहे ‘सारगासो समुद्र’. संपूर्ण जगभरात आपल्या प्रकारचा हा एकमेव समुद्र आहे, ज्याला स्वतःची जमीन किंवा किनारपट्टी नाही. हा समुद्र उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी स्थित आहे. शतकांपूर्वी जेव्हा शोधक खलाशी या मार्गावरून जायचे, तेव्हा ते याला ‘हरवलेल्या जहाजांचे आश्रयस्थान’ म्हणायचे. या समुद्राच्या शांत पाण्यात आणि विचित्र समुद्री गवतात जे जहाज येते, ते कायमचे फसते, अशी त्यांची समजूत होती. सारगासो समुद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे कमालीचे स्वच्छ आणि गडद निळे पाणी. या समुद्रातील ‘व्हिजिबिलिटी’ (पाण्याखाली पाहण्याची क्षमता) इतकी जास्त आहे की, तुम्ही 50 ते 60 मीटर खोलीपर्यंतच्या सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे पाहू शकता.

या शांत आणि गोलाकार फिरणार्‍या पाण्याखाली एक अत्यंत संवेदनशील आणि अनोखी परिसंस्था (Ecosystem) दडलेली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या समुद्रात पृथ्वीच्या भूतकाळातील आणि भविष्यातील अनेक मोठी रहस्ये दफन आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, जर या समुद्राला किनाराच नाही, तर त्याची सीमा कशी निश्चित होते? याचे उत्तर असे आहे की, या समुद्राला जमिनीऐवजी चारही बाजूंनी वाहणारे चार शक्तिशाली सागरी प्रवाह वेढून ठेवतात. पश्चिमेला : गल्फ स्ट्रीम, उत्तरेला : नॉर्थ अटलांटिक करंट, पूर्वेला : कॅनरी करंट आणि दक्षिणेला : नॉर्थ अटलांटिक इक्वेटोरियल करंट. हे चारही प्रवाह मिळून पाण्याच्या प्रवाहांचे एक असे ‘चक्रव्यूह’ तयार करतात, ज्याच्या मधोमध असणारे पाणी नेहमी शांत राहते. हवामान आणि वार्‍याच्या वेगानुसार या समुद्राच्या सीमा थोड्याफार बदलत राहतात.

या समुद्राचे नाव ‘सारगासो’ या पोर्तुगीज शब्दावरून पडले आहे, ज्याचा अर्थ एका विशिष्ट प्रकारचे सागरी गवत असा होतो. या समुद्राच्या वरच्या भागावर ‘सारगासम’ नावाच्या तपकिरी रंगाच्या सागरी गवताचे मोठे मैदान तरंगताना दिसते. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, या गवताला उगवण्यासाठी समुद्राचा तळ किंवा मातीची अजिबात गरज नसते. हे गवत पाण्याच्या पृष्ठभागावरच जन्माला येते आणि तिथेच पसरत जाते. प्राचीन कथांमध्ये या समुद्राला जहाजांसाठी धोकादायक सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात हा समुद्र सागरी जीवासांठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. हे तरंगणारे गवत अनेक दुर्मीळ मासे, खेकडे आणि कासवांसाठी सुरक्षित घर आणि अन्नाचा मुख्य स्त्रोत बनते. आधुनिक विज्ञान आणि उपग्रहांच्या अभ्यासातूनही हे सिद्ध झाले आहे की, किनारा नसलेला हा समुद्र आपल्या पृथ्वीच्या सागरी जीवनचक्राचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news