

तिरुवनंतपूरम : केरळम्च्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील ‘अराणमुला’ या छोट्याशा गावात एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा आरसा तयार केला जातो, ज्याला ‘अराणमुला कन्नाडी’ असे म्हणतात. हा कोणताही सामान्य काचेचा आरसा नाही, तर तो पूर्णपणे धातूपासून बनवला जातो. म्हणजेच यात काचेचा अजिबात वापर केला जात नाही. आपल्या याच अनोख्या वैशिष्ट्यामुळे आणि बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे हा आरसा जगभर प्रसिद्ध आहे. या कलेला 2005 मध्ये ‘जीआय टैग’देखील मिळाला आहे.
सामान्य आरशांमध्ये काचेच्या पाठीमागे पारा किंवा इतर रसायनांचा लेप दिलेला असतो, ज्यामुळे आपले प्रतिबिंब थोडे आतल्या बाजूला तयार होते. काहीवेळा ही प्रतिमा अस्पष्ट किंवा किंचित वाकडी दिसू शकते, याला ‘सेकंडरी रिफ्लेक्शन’ म्हणतात. याच्या उलट, अराणमुला कन्नाडीमध्ये काच नसल्यामुळे प्रकाश थेट धातूच्या चमकणार्या पृष्ठभागावर आदळून परावर्तित होतो, ज्याला ‘प्राईमरी रिफ्लेक्शन’ म्हणतात. यामुळेच या आरशात दिसणारे प्रतिबिंब अत्यंत स्वच्छ, स्पष्ट आणि अगदी जसे आहे तसे अस्सल दिसते. हा आरसा तांबे, टिन आणि निकेल यांच्या एका विशिष्ट आणि अचूक मिश्रणातून तयार केला जातो. हा आरसा बनवण्याची कला 500 वर्षांपेक्षाही जुनी आहे, जी केवळ काही निवडक कुटुंबांपुरतीच मर्यादित आहे.
आज केवळ 19 नोंदणीकृत कारागिरांनाच हा आरसा बनवण्याचा परवाना मिळाला आहे. प्रत्येक आरसा हाताने अत्यंत मेहनतीने पॉलिश केला जातो. एक आरसा पूर्णपणे तयार होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात आणि कारागिरांना यासाठी 1200 अंश सेल्सिअस तापमानाच्या भट्ट्यांजवळ काम करावे लागते. हा आरसा बनवण्याची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आहे. यामध्ये वापरल्या जाणार्या धातूंचे नेमके प्रमाण फक्त संबंधित कारागीर कुटुंबांनाच ठाऊक आहे. मात्र, आता या प्राचीन कलेवर संकट घोंगावत आहे.
आरशाचा साचा तयार करण्यासाठी पंबा नदीच्या पात्रातील एका विशिष्ट मातीचा वापर केला जातो, जी आता मिळणे कठीण होत चालले आहे. असे मानले जाते की, अराणमुलाचे हे शिल्पकार जुन्या काळात तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथून आलेले कास्य शिल्पकार होते. तेथील राजाने त्यांना अराणमुला येथील ‘पार्थसारथी मंदिरा’च्या बांधकामासाठी बोलावले होते. पुढे त्यांनी भांडी, दागिने आणि इतर कलाकृती बनवण्यास सुरुवात केली. केरळम्मधील प्रसिद्ध ‘पद्मनाभस्वामी मंदिर’ आणि ‘अराणमुलाचे पार्थसारथी मंदिर’ यांच्या उभारणीत या कारागिरांचे मोठे योगदान आहे.