Loktak Lake |
Loktak Lake | भारतातील ‘या’ राज्यात वसले आहे जगातील एकमेव तरंगते खेडे

Loktak Lake | भारतातील ‘या’ राज्यात वसले आहे जगातील एकमेव तरंगते खेडे

Published on

इंफाळ : भारताची विविधता केवळ संस्कृतीतच नाही, तर भौगोलिक रचनेतही थक्क करणारी आहे. ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात असलेल्या ‘लोकतक’ सरोवराने पर्यटकांचे आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेले आहे. या सरोवराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले ‘तरंगते खेडे’, जे जगातील अशा प्रकारचे एकमेव मानवी वस्तीचे ठिकाण मानले जाते.

लोकतक सरोवरात सेंद्रिय पदार्थ, माती आणि वनस्पती यांच्यापासून तयार झालेले प्रचंड मोठे थर तरंगताना दिसतात. स्थानिक भाषेत याला ‘फुमडी’ असे म्हटले जाते. हे थर इतके मजबूत आणि जाड असतात की, त्यावर स्थानिक मच्छीमार समुदायाने आपली छोटी घरे (ज्याला ‘इम्पाश’ म्हणतात) बांधली आहेत. लांबून पाहिल्यास ही घरे पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. केवळ घरेच नाही, तर याच फुमडींवर आधारित ‘कैबुल लामजाओ’ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान देखील येथे आहे. हे उद्यान दुर्मीळ ‘सांगाई’ हरणांचे हक्काचे निवासस्थान आहे.

येथील शेकडो कुटुंबे मासेमारीवर अवलंबून असून, ते या तरंगत्या बेटांवरच आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात. एका घराकडून दुसर्‍या घराकडे जाण्यासाठी स्थानिक लोक छोट्या होड्यांचा वापर करतात. अलीकडच्या काळात वाढते प्रदूषण आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे या ‘फुमडीं’च्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. या नैसर्गिक वारशाचे जतन करण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन ठरत आहे. पाण्यावर तरंगणारी घरे, सरोवराचे निळे पाणी आणि सभोवतालची हिरवळ यामुळे मणिपूरच्या पर्यटनात मोठी भर पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news