

लंडन : पुरातत्त्वशास्त्रज्ञांना हॅड्रियन्स वॉलजवळील ‘विंडोलँडा’ या प्राचीन रोमन किल्ल्यामध्ये हजारो जतन करून ठेवलेले बूट सापडले आहेत. परंतु, यातील एक बूट कदाचित जगातील सर्वात जुन्या ‘शाॅवर शू’चे (आंघोळीच्या वेळी घालण्याची चप्पल) उदाहरण असू शकतो.
लाकडी तळ आणि वरच्या बाजूला चामड्याची पट्टी असलेल्या या बुटाला ‘बाथ क्लॉग’ असे म्हटले जाते. आजकाल लोक संसर्ग किंवा पायाला होणारी बुरशी टाळण्यासाठी जिमच्या लॉकर रूममधील शाॅवरमध्ये किंवा नेल सलूनमध्ये ज्या प्रकारच्या स्लिप-ऑन चपला वापरतात, ही त्याचीच प्राचीन आवृत्ती आहे. रोमन लोक या उंच तळाच्या चपलांना लॅटिन भाषेत ‘स्कल्पोनी’ म्हणत असत. स्नानगृहातील निसरड्या आणि प्रचंड गरम जमिनीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते या चपला वापरत असत.
ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंचे जतन करणाऱ्या ‘इंग्लिश हेरिटेज’ या संस्थेच्या माहितीनुसार, रोमन स्नानगृहे ही त्या काळातील सार्वजनिक एकत्र येण्याची ठिकाणे होती. आंघोळ करणारी व्यक्ती प्रथम आपले कपडे उतरवून थंड खोलीतून कोमट खोलीत आणि नंतर तिथून गरम खोलीत जात असे. त्यानंतर पुन्हा थंड पाण्याच्या विहिरीत डुबकी मारण्यासाठी पहिल्या खोलीत परत येत असे. रोमन स्नानगृहांच्या रचनेतील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे ‘हायपोकॉस्ट सिस्टीम.’ यामध्ये कोमट आणि गरम खोल्या तसेच तिथली स्नानगृहे गरम करण्यासाठी उंचावलेल्या जमिनीच्या खाली भट्टी पेटवली जात असे. या उष्णता प्रणालीमुळे तिथली जमीन स्पर्श करण्यासाठी अतिशय गरम व्हायची. म्हणूनच पायांचे रक्षण करण्यासाठी या चपला वापरल्या जात.
रोमन शाॅवर शूज हे लवकर खराब होणाऱ्या (नाशिवंत) साहित्यापासून बनवले जात असल्यामुळे, त्यांचे सर्वात जुने आणि उत्तम नमुने इंग्लंडच्या नॉर्थम्बरलँड येथील ‘विंडोलँडा’ या रोमन किल्ल्यात सापडले आहेत. येथील ऑक्सिजनविरहित चिखलाच्या थरांमुळे हे सेंद्रिय अवशेष शेकडो वर्षांनंतरही जतन झाले आहेत. कॅनडातील वेस्टर्न ओंटारियो युनिव्हर्सिटीच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ एलिझाबेथ ग्रीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विंडोलँडा येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ५,००० हून अधिक रोमन बूट सापडले आहेत, ज्यापैकी साधारणत: ५० बाथ क्लॉग (शाॅवर शूज) आहेत. यातील बहुतेक चपलांना १ ते २ इंच (२.५ ते ५ सेंटिमीटर) उंच लाकडी तळ आणि वरच्या बाजूला चामड्याचा पट्टा आहे.