

पॅरिस : कोणताही पाळीव प्राणी हा फक्त एक प्राणी नसून तो त्या कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य बनतो. घरात त्याचे असणे आनंद, आपुलकी आणि एक वेगळेच नाते घेऊन येते. म्हणूनच जेव्हा एखादा पाळीव प्राणी दीर्घकाळ कुटुंबासोबत राहतो, तेव्हा तो आयुष्यातील आठवणींचा एक मोठा भाग बनतो. सध्या अशाच एका खास श्वानाची (कुत्रा) गोष्ट जगभरातील लोकांना भावुक करत आहे. जगातील सर्वात वयस्कर श्वानांपैकी एक मानला जाणारा फ्रान्समधील ‘लाझारे’ नावाचा श्वान आता या जगातून निरोप घेऊन गेला आहे. वयाची 30 वर्षे पूर्ण करून त्याने जगाला थक्क केले होते.
लाझारे हा सामान्य श्वानांपेक्षा खूप जास्त काळ जगला. एका इन्स्टाग्राम पोस्टनुसार, त्याच्या अधिकृत कागदपत्रांवर आणि मायक्रोचिपच्या आधारे त्याची जन्मतारीख 4 डिसेंबर 1995 अशी नोंदवण्यात आली होती. या खुलाशामुळे लोक आश्चर्यचकित झाले, कारण श्वानाचे इतक्या वयापर्यंत जगणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. जर माणसाच्या वयाशी याची तुलना केली, तर लाझारे सुमारे 130 वर्षांपेक्षा जास्त काळ जगला, कारण सामान्यतः श्वानांचे आयुष्य केवळ 10 ते 15 वर्षेच असते. लाझारेच्या या विक्रमी वयामुळे लोक त्याला जगातील सर्वात वयस्कर श्वान मानत होते. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्कडून याच्या अधिकृत जागतिक विक्रमाची पूर्णपणे पुष्टी होण्यापूर्वीच, त्याच्या आयुष्याचा हा प्रवास संपला.
वाढत्या वयामुळे लाझारेच द़ृष्टी जवळपास गेली होती. त्याला ऐकण्यातही त्रास होत होता आणि वयोमानानुसार त्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत होता. तरीही, त्याच्यासोबत राहणार्या लोकांच्या मते, त्याचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि उत्साही होता. शरीर थकले तरी माणसाळलेले नाते त्याला जगण्याची ताकद देत होते. लाझारेने आपल्या आयुष्याचा मोठा काळ एकाच मालकासोबत घालवला होता. परंतु, काही काळापूर्वी त्याच्या मालकाचा मृत्यू झाला, ज्यानंतर त्याची रवानगी प्राण्यांच्या निवारा केंद्रात करण्यात आली. एका महिलेने त्याला पाहिले आणि तिला त्याच्याबद्दल आपुलकी वाटली. तिने लाझारेला दत्तक घेऊन आपल्या घरी आणले. नव्या घरात मिळालेले हे सुख जास्त काळ टिकू शकले नाही. काही दिवसांतच लाजारेची तब्येत बिघडली आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.