

नवी दिल्ली : जगातील कोणताही पक्षी असो तो किती वर्षे जगतो, याविषयी नेहमीच कुतूहल असते. काही अपवाद वगळता पक्षाचे वय फार मोठे नसते. मात्र, एक 75 वर्षांचा पक्षी आहे, आणि तो आजही अंडी घालत आहे, असे जर सांगितले तर कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही; पण हे खरे आहे. लेसन अल्बाट्रॉस प्रजातील एक पक्षी ज्याचे नाव संशोधकांनी ‘विजडम’ असे ठेवले आहे. विजडम ही चक्क 75 वर्षांची असून, आजही ती यशस्वीरीत्या अंडी घालत आहे.
लेसन अल्बाट्रॉसचे सामान्य आयुष्य सुमारे 30 वर्षांचे असते; पण विजडमने 75 वर्षांचे आयुष्य जगून अपेक्षेपेक्षा खूप मोठी मजल मारली आहे. यू.एस. फिश अँड वाईल्डलाईफ सर्व्हिसच्या जीवशास्त्रज्ञांनी 1956 मध्ये, जेव्हा विजडमने पहिले अंडे घातले होते, तेव्हा तिला पहिल्यांदा ओळखले आणि तिच्या पायाला बँड लावला होता. विजडम सुमारे 68 व्यांदा कुआईहेलानी (मिडवे अटोल) बेटावर परतली असून, तिने आजवर 50 ते 60 अंडी घातली आहेत आणि त्यातून सुमारे 30 पिल्लांना यशस्वीरीत्या वाढवले आहे.
अल्बाट्रॉस दरवर्षी फक्तएकच अंडे घालतो, त्यामुळे विजडमचा हा विक्रम अत्यंत तिचा पूर्वीचा दीर्घकाळचा साथीदार काही वर्षांपूर्वी दिसला नाही. यंदा ती ईएक्स25 नावाच्या नवीन साथीदारासोबत बेटावर परतली आहे आणि दोघांनी घरटे बांधण्यास सुरुवात केली आहे. विजडमने तिच्या आयुष्यात सुमारे 37 लाख मैल प्रवास केला आहे. या काळात तिने त्सुनामी, समुद्री प्रदूषण, मासेमारीचे धोके आणि हवामान बदलामुळे वाढणार्या धोक्यांना तोंड दिले आहे.
आजच्या काळात पर्यावरणाचे आणि बेटावरील प्रजनन स्थळांचे नुकसान होत असताना, विजडमचे सतत बेटावर परतणे वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करते, असे संशोधकांचे मत आहे. विजडम केवळ एक दंतकथा नसून, कुआईहेलानी बेटाच्या संपूर्ण परिसंस्थेची राजदूत आहे. विजडमचा जीवनप्रवास दीर्घायुष्य, लवचिकता आणि निसर्गातील ताकद याची साक्ष देतो.
कुआईहेलानी बेटाचे महत्त्व
कुआईहेलानी हे उत्तर प्रशांत महासागरातील एक दुर्गम प्रवाळ बेट आहे. समुद्री पक्षी आणि सागरी जीवांच्या जीवनासाठी हे बेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.