world oldest towers | सीरियामध्ये जगातील सर्वात प्राचीन मनोरे

world oldest towers
world oldest towers | सीरियामध्ये जगातील सर्वात प्राचीन मनोरेFile Photo
Published on
Updated on

दमास्कस : इजिप्तमधील तुतानखामेनचा मकबरा असो किंवा इटलीतील पॉम्पेई शहर, पुरातत्त्व विभागाच्या शोधांनी नेहमीच मानवी इतिहासाला नवी दिशा दिली आहे. मात्र, सध्या गृहयुद्धाने होरपळलेल्या सीरियामध्ये लागलेला ‘टेल करामेल’ येथील शोध शास्त्रज्ञांसाठी सर्वात मोठा चमत्कार ठरला आहे. हजारो वर्षांपूर्वी येथे एक अत्यंत प्रगत संस्कृती नांदत होती, याचे पुरावे आता समोर आले आहेत.

उत्तर सीरियातील अलेप्पो शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेल करामेलमध्ये उत्खननादरम्यान दगडांचे गोलाकार टॉवर्स (मनोरे) सापडले आहेत. रेडिओकार्बन डेटिंगनुसार, हे टॉवर्स इसवी सन पूर्व 11 व्या सहस्राब्दीपासून ते इसवी सन पूर्व 9650 मधील आहेत. मानवी इतिहासातील ही अशा प्रकारची सर्वात जुनी रचना मानली जात आहे. या शोधामुळे मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कथेला एक नवीन कलाटणी मिळाली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे विशाल टॉवर्स केवळ राहण्यासाठी किंवा देखरेखीसाठी नव्हते. त्यांचा वापर धार्मिक कार्यांसाठी आणि सामूहिक सभांसाठी केला जात असावा.

त्या काळातील लोक येथे एकत्र येऊन विधी आणि अनुष्ठान करत असत. यावरून हे स्पष्ट होते की, इतक्या प्राचीन काळी देखील मानवी समाज संघटित होता आणि त्यांच्या स्वतःच्या सांस्कृतिक परंपरा होत्या. टॉवर्सच्या परिसरात सुमारे 90 घरे आणि लहान खोल्या सापडल्या आहेत, ज्यामुळे ही एक मोठी वस्ती असल्याचे सिद्ध होते. येथे तीन मंदिरांचे अवशेष, अनेक चुली आणि खड्डे सापडले आहेत, जे त्या काळातील रोजच्या जगण्याची साक्ष देतात. चकमक दगड आणि हाडांपासून बनवलेली अवजारे तसेच सजावटीच्या वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तूंवर भौमितिक आकृत्या, प्राणी आणि मानवांची चित्रे कोरलेली आहेत. शिकारी म्हणून जगणारा समुदाय इतकी प्रगत कला कशी विकसित करू शकला, याचे आश्चर्य शास्त्रज्ञांना वाटत आहे.

उत्खननात 35 मानवी सांगाडे आणि प्राण्यांचे अवशेषही सापडले आहेत. मृतांना घरांच्या खाली किंवा इमारतींच्या दरम्यान खड्ड्यात दफन केले जात असे. विशेष म्हणजे, मृतांना गर्भातील अर्भकाप्रमाणे ठेवले जायचे आणि काही थडग्यांमध्ये दगड किंवा हाडांचे मणी सापडले आहेत. यावरून त्या काळातील लोकांचा ‘मृत्यूनंतरच्या जीवनावर’ विश्वास होता, असे दिसून येते. टेल करामेलचा हा शोध मानवी सभ्यतेच्या सुरुवातीच्या काळाकडे पाहण्याचा आपला द़ृष्टिकोन बदलणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news