

लंडन : इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने 2025 चा ग्लोबल पीस इंडेक्स (जागतिक शांतता निर्देशांक) जाहीर केला आहे. या अहवालानुसार, आईसलँड हा जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देश बनला आहे. विशेष म्हणजे, हा देश 2008 पासून सलग पहिल्या स्थानावर आहे.
ग्लोबल पीस इंडेक्स हा एक अहवाल आहे, जो जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देशांची माहिती देतो. या अहवालात देशांना हिंसा, गुन्हेगारी, युद्धाची परिस्थिती आणि शेजारील देशांशी असलेले संबंध यांसारख्या निकषांवर तपासले जाते आणि त्यानुसार त्यांना क्रमवारी दिली जाते. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 चे मूल्यांकन तीन मुख्य बाबींवर आधारित आहे : सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि लष्करी खर्च.
या सर्व बाबतीत आईसलँड पुन्हा एकदा आघाडीवर आहे. आईसलँडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे, लोकांमध्ये एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि त्यांच्याकडे कोणतीही सेना नाही. याच कारणांमुळे आईसलँड आजही जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. आईसलँडनंतर, आयर्लंड, न्यूझीलंड, फिनलँड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल, डेन्मार्क आणि स्लोव्हेनिया हे जगातील दहा सर्वात शांत देशांच्या यादीत समाविष्ट आहेत.
या 163 देशांच्या जागतिक शांतता निर्देशांक अहवालात भारताला 115 वे स्थान मिळाले आहे. तर पाकिस्तान 144 व्या स्थानावर आहे. भारत अजूनही पहिल्या 100 देशांच्या यादीत नाही. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार, उप-सहारा आफ्रिका आणि मध्य पूर्व हे जगातील सर्वात धोकादायक प्रदेश आहेत. रशिया, युक्रेन, सुदान, काँगो आणि येमेन यांसारखे देश या यादीत सर्वात खालच्या स्थानी आहेत. या देशांमध्ये हिंसा आणि संघर्ष वाढतच आहे. दक्षिण आफ्रिकेतील शांततादेखील मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्याचबरोबर, बांगला देश आणि पाकिस्तानमध्येही लोकांमध्ये अशांती आणि परिस्थिती बिघडली आहे.