

बर्न : शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शिक्षणावर होणारा खर्चसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही शाळा अशा आहेत जिथे मुलांची वर्षाची फी एवढी असते की, त्या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पालक शंभरवेळा विचार करतात. त्याचवेळी जगातील सर्वात महागड्या शाळेबद्दल जाणून घ्यायला हवे. या शाळेची फी एवढी आहे की, त्यात तुम्ही महागडी मर्सिडीज कार सहज खरेदी करू शकता.
सध्या अनेक पालक आपल्या मुलाला चांगल्या शाळेत कसा प्रवेश मिळेल, याच्या विचारात गढले आहेत. या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात महागडी शाळा स्विझर्लंडमध्ये असून, या शाळेत पन्नासहून अधिक देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळेची वर्षभराची फी ही लाखांमध्ये नाही तर कोट्यवधीमध्ये असते. मीडिया रिपोर्टस्नुसार ही जगातील सर्वात महागडी शाळा आहे. तेथील वार्षिक फी आहे, सुमारे एक कोटी रुपये. या निवासी शाळेचे नाव इन्स्टिट्यूट ले रोझी असे असून, त्यास ले रोझी किंवा केवळ रोझी म्हणून संबोधले जाते.
1880 मध्ये पॉल एमिल कर्नल यांनी वॉडच्या कँटोनमधील रोले शहरात शॅटो डू रोझीच्या जागेवर स्थापन केलेली ही शाळा स्वित्झर्लंडमधील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. बर्न कँटोनमधील गस्टाड या स्की रिसॉर्ट गावात शाळेचा एक कॅम्पस्देखील आहे. मुख्य म्हणजे ले रोझीचा समावेश जगातील 150 सर्वोत्तम खासगी शाळांच्या द स्कूल्स इंडेक्समध्ये आणि स्वित्झर्लंडमधील टॉप 10 आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये केला जातो.
शाळेच्या कॅम्पस्मध्ये 69 एकर क्षेत्रावर मैदाने असून, तेथीलच एका देखण्या सरोवरात नौकानयन केंद्राची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याखेरीज अन्य सर्व सुविधा या शाळेत विद्यार्थ्यांच्या दिमतीला आहेत. या शाळेत स्पेन, बेल्जियम, इजिप्त, इराण आणि ग्रीस या देशांच्या राजघराण्यांतील मुले शिक्षण घेतात. कारण, सर्वसामान्यांना इथली फी परवडत नाही.