

नवी दिल्ली : जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली चलनांचा विषय निघतो, तेव्हा अनेकांच्या मनात अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पौंड किंवा युरोचे नाव येते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या सर्व चलनांना मागे टाकत, मध्य-पूर्वेतील एका लहान देशाचे चलन ‘कुवैती दिनार’ जगातील सर्वात महागडे चलन म्हणून आपले स्थान टिकवून आहे. हे केवळ एक आर्थिक सत्य नसून, कुवैतच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे आणि धोरणात्मक नियोजनाचे प्रतीक आहे. कुवैती दिनारची किंमत ऐकून कोणीही चकित होऊ शकते. सध्याच्या विनिमय दरानुसार : 1 कुवैती दिनार हा 3.25 अमेरिकन डॉलरइतका तसेच 270 भारतीय रुपयांइतका आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला एक कुवैती दिनार हवा असेल, तर तुम्हाला तब्बल 270 रुपये मोजावे लागतील. या तुलनेत एक अमेरिकन डॉलर सुमारे 83 रुपयांना मिळतो. या आकडेवारीवरून दिनारच्या मूल्याची कल्पना येते.
कुवैती दिनारच्या या अफाट मूल्यामागे अनेक ठोस आर्थिक कारणे आहेत. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही, तर त्यामागे देशाची दूरद़ृष्टी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आहे. कुवैतची अर्थव्यवस्था पूर्णपणे कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. जगातील तेलाच्या एकूण साठ्यांपैकी मोठा साठा कुवैतमध्ये आहे. तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणार्या प्रचंड परकीय चलनाने कुवैतची तिजोरी नेहमीच भरलेली असते, ज्यामुळे त्यांचे चलन मजबूत राहते. तेलाच्या विक्रीमुळे कुवैतकडे परकीय चलनाचा मोठा साठा आहे.
देशाची अर्थव्यवस्था अत्यंत स्थिर असून, सरकारने एक मोठा ‘सॉव्हरिन वेल्थ फंड’ तयार केला आहे, जो देशाच्या संपत्तीची गुंतवणूक करतो आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवतो. कुवैतने आपल्या दिनारला केवळ अमेरिकन डॉलरशी न जोडता, अनेक प्रमुख जागतिक चलनांच्या एका ‘बास्केट’ (Basket of Currencies) सोबत जोडले आहे. यामुळे कोणत्याही एका चलनाच्या किमतीतील चढ-उताराचा दिनारवर थेट परिणाम होत नाही आणि त्याचे मूल्य स्थिर राहते. कुवैत हा एक ‘कर-मुक्त’ देश आहे, जिथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. यामुळे देशात व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे, जे अर्थव्यवस्थेला आणखी बळ देते.