

मॉरिटानिया : जगातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांच्या चर्चा आपण नेहमीच ऐकतो; पण आफ्रिकेतील मॉरिटानिया देशात असा एक रेल्वे मार्ग आहे जो केवळ धोक्यासाठी ओळखला जातो. ‘आयरन ओर ट्रेन’ असे नाव असलेल्या या गाडीचा प्रवास म्हणजे मृत्यूला प्रत्यक्ष साद घालण्यासारखे आहे. सहारा वाळवंटातून १८ तास सलग धावणाऱ्या या ट्रेनमध्ये लोक कोणत्याही सुरक्षेविना प्रवास करतात.
काय आहे ‘आयरन ओर ट्रेन’?
ही मुळात एक मालवाहू ट्रेन आहे, जी ज्वारात येथील खाणींमधून लोखंडी खनिज घेऊन नौआधिबू बंदरापर्यंत जाते. या ट्रेनची लांबी तब्बल २ ते ३ किलोमीटर लांब असते, जी जगातील सर्वात लांब गाड्यांपैकी एक आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी डबे नसतात. लोक उघड्या मालवाहू डब्यात भरलेल्या लोखंडी खनिजाच्या ढिगाऱ्यावर बसून प्रवास करतात.
१८ तास जीव मुठीत धरून प्रवास
सहारा वाळवंटातील हा ७०० किलोमीटरचा प्रवास अत्यंत खडतर असतो. या प्रवासाची काही थरारक वैशिष्ट्ये अंगावर काटा आणणारी आहेत. अतिविषम तापमानाचा परिणाम प्रवास करताना सहन करावा लागतो. दिवसा या वाळवंटातील तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तर रात्री कडाक्याची थंडी असते. या ट्रेनमध्ये ना छत आहे, ना जागा, ना शौचालय. प्रवाशांना खाण्यापिण्यापासून ते नैसर्गिक विधींपर्यंत सर्व गोष्टी चालत्या ट्रेनमध्येच कराव्या लागतात. वाळवंटातील वेगवान वारे आणि उडणारी लोखंडी धूळ प्रवाशांच्या डोळ्यांत आणि फुफ्फुसात जाण्याचा धोका असतो. धोकादायक असूनही, जगभरातील अनेक साहसी पर्यटक या ट्रेनचा अनुभव घेण्यासाठी मॉरिटानियाला येतात. या ट्रेनचे कोणतेही तिकीट नसते; लोक थेट खनिज भरलेल्या डब्यावर चढतात. पर्यटकांच्या मते, हा अनुभव अंगावर काटा आणणारा असतो. सोबत पुरेसे पाणी, सुका मेवा, ब्लँकेट आणि धूळ टाळण्यासाठी खास चष्मा (गॉगल) ठेवणे अनिवार्य असते. स्थानिक लोकांसाठी हा रोजच्या प्रवासाचा मार्ग असला, तरी बाहेरील लोकांसाठी हा १८ तासांचा प्रवास ‘मौत का कुआँ’ पार करण्यापेक्षा कमी नसतो.