

सिडनी : ‘सिलिकॉन क्वांटम कॉम्प्युटिंग’ (SQC) मधील भौतिकशास्त्रज्ञांनी जगातील आतापर्यंतची सर्वात अचूक क्वांटम कॉम्प्युटिंग चिप विकसित केल्याचा दावा केला आहे. सिडनीस्थित या स्टार्टअप कंपनीने एका नवीन प्रकारच्या आर्किटेक्चरचा वापर करून हे यश संपादन केले असून, यामुळे भविष्यातील संगणक प्रणाली अधिक वेगवान आणि त्रुटीमुक्त होणार आहेत.
या चिप्स सिलिकॉनवर आधारित असून, त्यामध्ये फॉस्फरस अणूंचा वापर करण्यात आला आहे. आवर्त सारणीतील (Periodic Table) 14 वे आणि 15 वे मूलद्रव्य (सिलिकॉन आणि फॉस्फरस) वापरले असल्याने या नवीन आर्किटेक्चरला ‘14/15’ असे नाव देण्यात आले आहे. ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात 17 डिसेंबर रोजी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये ‘फिडेलिटी रेट’ अत्यंत महत्त्वाचा असतो, जो संगणकाची त्रुटी सुधारण्याची क्षमता दर्शवतो. SQC ने 9 न्यूक्लियर क्यूबिटस् आणि 2 अॅटॉमिक क्यूबिटस् असलेल्या संगणकावर 99.5 टक्के ते 99.99 टक्क्यांपर्यंतची अचूकता मिळवली आहे.
वेगळ्या क्लस्टर्समध्ये अणू-आधारित सिलिकॉन क्वांटम कॉम्प्युटिंगचे हे जगातील पहिलेच यशस्वी सादरीकरण ठरले आहे. सध्याच्या इतर क्वांटम संगणकांच्या तुलनेत यातील क्यूबिटस्ची संख्या कमी वाटत असली, तरी ‘14/15’ आर्किटेक्चर हे मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यायोग्य आहे. संशोधकांच्या मते, हे तंत्रज्ञान भविष्यात लाखो क्यूबिटस् असलेल्या त्रुटीमुक्त क्वांटम प्रोसेसिंग युनिटस्साठी (QPUs) पाया ठरू शकते. क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये माहिती साठवण्यासाठी ‘क्यूबिटस्’चा (Qubits) वापर होतो. सध्या जगभरात यावर विविध पद्धतीने काम सुरू आहे.