

वॉशिंग्टन ः संशोधकांनी जगातील सर्वात लांब गुहा असलेल्या अमेरिकेतील ‘मॅमथ केव्ह’मध्ये खोलवर एका प्राचीन शार्कच्या अवशेषांचा शोध लावला आहे. गुहेच्या भिंतींमध्ये सापडलेला हा शार्क सुमारे 34 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. या शोधामुळे पृथ्वीच्या प्राचीन सागरी जीवसृष्टीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
केंटकीमधील मॅमथ गुहेत सापडलेल्या या पर्कला ‘मॅकॅडेन्स ओल्सोनी’ असे नाव देण्यात आले आहे. हा शार्क आकाराने लहान, म्हणजे सुमारे 1 फुटापेक्षा (30 सेंटिमीटर) कमी लांबीचा होता. संशोधकांच्या मते, तो आपली शिकार चिरडण्यासाठी दातांच्या एका विशिष्ट वक्र रांगेचा वापर करत असे. हा शार्क प्रामुख्याने गोगलगाय आणि कृमी यांसारखे कवचधारी जीव खात असावा, असा अंदाज आहे. त्याची दातांची रचना शिकार पकडण्यासाठी नव्हे, तर ती फोडून किंवा चिरडून खाण्यासाठी अधिक उपयुक्त होती. तो सुमारे 34 कोटी वर्षांपूर्वी, पृथ्वीवर डायनासोरच्या आगमनापूर्वीच्या काळात अस्तित्वात होता. एका गुहेत सागरी जीवाचे अवशेष कसे सापडले, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. याचे उत्तर गुहेच्या इतिहासात दडलेले आहे. ज्या खडकांमध्ये ही गुहा आहे, ते खडक सुमारे 32 ते 36 कोटी वर्षांपूर्वी ‘मिसिसिपियन समुद्र’ नावाच्या एका उथळ खार्या पाण्याच्या समुद्राखाली तयार झाले. ही गुहा मात्र बरीच नवीन आहे. सुमारे 1 ते 1.5 कोटी वर्षांपूर्वी, पृष्ठभागावरील नद्या आणि प्रवाहांचे पाणी खडकांमध्ये झिरपले आणि हळूहळू खडक कोरून आज दिसणारे गुहेचे मार्ग तयार झाले. या प्रक्रियेत समुद्राखाली गाडले गेलेले जीवाश्म उघडे पडले. मॅमथ गुहेची नेमकी लांबी अद्याप अज्ञात आहे; परंतु संशोधकांनी आतापर्यंत 686 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे मार्ग शोधले आहेत आणि अजूनही नवीन मार्ग सापडत आहेत. ही गुहा म्हणजे प्राचीन माशांच्या जीवाश्मांचा खजिनाच आहे. आतापर्यंत येथे 70 हून अधिक विविध लुप्त झालेल्या प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत.