

मासेरु : दक्षिण आफ्रिकेजवळील लेसोथो देशात असलेल्या काओ खाणीत एक प्रचंड मोठा आणि दुर्मीळ 108.39 कॅरेटचा गुलाबी हिरा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय रत्नशास्त्रीय संस्थेच्या (आयजीआय) अहवालानुसार, हा शोध हिरा उद्योगाला हादरवून सोडणारा असून, या हिर्याची किंमत लिलावात कोट्यवधी डॉलर्समध्ये जाण्याची शक्यता आहे. 108.39 कॅरेट वजनाचा हा हिरा आजपर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या गुलाबी हिर्यांपैकी एक आहे.
काओ खाणीतील या एकाच खडबडीत दगडातून (रफ स्टोन) अनेक मौल्यवान पॉलिश केलेले हिरे मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा हिरा उच्च (टाईप एलएलए) श्रेणीतील आहे. नायट्रोजनमुक्त असा कोणतीही रासायनिक अशुद्धता नसलेला हा हिरा नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या सर्वात शुद्ध हिर्यांपैकी एक मानला जातो. या हिर्याची गुलाबी छटा अत्यंत तीव्र आणि आकर्षक आहे, ज्यामुळे संग्रहक आणि गुंतवणूकदार यांच्यात त्याची मोठी मागणी आहे.
इतर हिर्यांमध्ये रंग रासायनिक अशुद्धतेमुळे येतो; पण गुलाबी हिर्यांचा रंग त्यांच्या अंतर्गत स्फटिक रचनेत (इंटरनल क्रिस्टल स्ट्रक्चर ) झालेल्या बदलांमुळे येतो. पृथ्वीच्या खोलवर अति उष्णता आणि दाबामुळे हिर्याच्या रचनेत विकृती (स्ट्रक्चरल डिफॉरमेशन) निर्माण होतात, ज्यामुळे हिर्याला हा विशिष्ट गुलाबी रंग मिळतो. याच विकृतींमुळे गुलाबी हिरे अत्यंत मौल्यवान बनतात. लेसोथो या लहान देशासाठी हिरा उद्योग हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. काओ खाण विशेषतः दुर्मीळ रंगीत हिर्यांसाठी प्रसिद्ध आहे.
या एकाच उच्च-मूल्याच्या हिर्याच्या विक्रीतून देशाला मोठे राष्ट्रीय महसूल मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेवर सकारात्मक परिणाम होईल. हा हिरा शोधणारी कंपनी स्टॉर्म माऊंटन डायमंडस् रिस्पॉन्सिबल ज्वेलरी कौन्सिलची सदस्य आहे, जी नैतिक आणि जबाबदार खाणकाम पद्धती सुनिश्चित करते.या महत्त्वपूर्ण शोधाने लेसोथोचे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा हिर्यांचे प्रमुख उत्पादक म्हणून ठळक केले आहे.