

ऑकलंड : कल्पना करा एका अशा पोपटाची, जो उडू शकत नाही; पण एखाद्या गिर्यारोहकाप्रमाणे झाडांवर सहज चढतो. ज्याचं शरीर गोलमटोल आहे आणि ज्याचं आयुष्य माणसांएवढं, म्हणजे तब्बल 90 वर्षांचं असू शकतं! हा आहे न्यूझीलंडचा ‘काकापो’, जगातील सर्वात मोठा आणि विचित्र सवयी असलेला पोपट.
न्यूझीलंडमध्ये आढळणारा हा अवाढव्य पोपट पाहिल्यावर तुमचं लक्ष सर्वात आधी त्याच्या गोलमटोल शरीराकडे जाईल. त्याचे डोके आणि शरीर दोन्हीही आकर्षकपणे गोलाकार असतात, चेहरा घुबडासारखा दिसतो आणि पाय मजबूत असतात. आधुनिक पोपटांमध्ये तो सर्वात मोठा आहे. नर काकापोची लांबी 25 इंच (64 सेंटीमीटर) पर्यंत वाढू शकते आणि वजन जवळपास 4 किलोग्रँमपर्यंत असू शकते. इतकेच नाही, तर काकापो हा जगातील सर्वात जास्त काळ जगणार्या पक्ष्यांपैकी एक असून, तो 90 वर्षांपर्यंत जगू शकतो, असा अंदाज आहे.
माओरी भाषेत ‘काकापो’ या नावाचा अर्थ ‘रात्रीचा पोपट’ असा होतो, जो त्याच्या निशाचर सवयी दर्शवतो. काकापो उडू शकत नसले, तरी ते लांब अंतरापर्यंत चालू शकतात आणि कुशल गिर्यारोहक आहेत. ते आपल्या लहान पंखांचा तोल सांभाळण्यासाठी वापर करून झाडांवर सहज चढतात आणि उड्या मारतात. धोक्याची जाणीव झाल्यावर काकापो जागीच स्थिर होतात आणि त्यांच्या पाचूच्या रंगाच्या पिसार्यामुळे ते जंगलाच्या हिरव्यागार पार्श्वभूमीत जवळजवळ अद़ृश्य होतात. नर काकापोच्या पिसांना एक विशिष्ट ‘गोड आणि वनस्पतीसारखा’ वास येतो, जो त्याच्या मिलनाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असावा.