World’s Largest Family | १८० हून अधिक सदस्यांचे जगातील सर्वात मोठे कुटुंब!

World’s Largest Family |
World’s Largest Family | १८० हून अधिक सदस्यांचे जगातील सर्वात मोठे कुटुंब!
Published on
Updated on

ऐझॉल : एकाच घरात साधारणतः ५ ते १० सदस्य राहतात; मात्र ईशान्य भारतातील मिझोराम राज्यामध्ये असे एक अनोखे आणि विशाल कुटुंब आहे, जे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपल्या अवाढव्य आकारासाठी प्रसिद्ध आहे. मिझोराममधील बाक्तांग या दुर्गम गावात राहणारे हे कुटुंब ‘झिओना चाना’ यांचे असून, यामध्ये १८० हून अधिक सदस्य एकाच प्रचंड इमारतीमध्ये एकत्र राहतात.

या कुटुंबाचे प्रमुख झिओना चाना (ज्यांचे जून २०२१ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले) हे ‘चाना पॉल’ या धार्मिक पंथाचे प्रमुख होते. या पंथात बहुपत्नीत्वाला परवानगी आहे. झिओना चाना यांना ३९ पत्नी, ९४ मुले, १४ सुना, ३३ नातवंडे आणि एक पणतू असा १८० पेक्षा जास्त सदस्यांचा मोठा परिवार आहे. या अवाढव्य कुटुंबासाठी ‘छुआन थार रन’ (नव्या पिढीचे निवासस्थान) नावाची एक १०० खोल्यांची चार मजली विशाल इमारत बांधण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबाचे व्यवस्थापन एखाद्या मोठ्या लष्करी तुकडीसारखे किंवा वसतिगृहासारखे चालते. घरातील स्वयंपाकाची जबाबदारी चाना यांच्या पत्नी आणि मुलींवर असते. एका वेळच्या जेवणासाठी साधारण १०० किलो तांदूळ, ६० किलो बटाटे आणि ३० ते ४० कोंबड्या किंवा मोठ्या प्रमाणावर मांस लागते.

कुटुंबातील पुरुष सदस्य शेती, लाकूडकाम, फर्निचर बनवणे आणि घराची इतर कामे करतात, तर महिला स्वयंपाक आणि साफसफाईची जबाबदारी सांभाळतात. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी गावात स्वतःची एक शाळादेखील स्थापन केली आहे. हे कुटुंब इतके प्रसिद्ध आहे की, मिझोराममधील बाक्तांग गाव केवळ या कुटुंबामुळे पर्यटनाचे एक मोठे केंद्र बनले आहे. जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांनी, ‘रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड ॲकॅडमी’ने या कुटुंबाची जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून नोंद घेतली आहे. जरी २०२१ मध्ये कुटुंबप्रमुख झिओना चाना यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे सर्व वंशज आणि संपूर्ण कुटुंब आजही त्याच शिस्तीने आणि प्रेमाने एकाच छताखाली एकत्र राहून या अनोख्या परंपरेचा वारसा पुढे चालवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news