

वॉशिंग्टन : तुमच्या खिशात असलेला स्मार्ट फोन आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेला नाही, तर तो तुमचा जीव वाचवणारा एक महत्त्वाचा रक्षक ठरू शकतो. गुगलने जगभरातील 200 कोटींहून अधिक अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये असलेल्या मोशन सेन्सर्सचा वापर करून एक अशी भूकंप पूर्व-सूचना प्रणाली तयार केली आहे, जी पारंपरिक भूकंपमापक यंत्रांइतकीच प्रभावी असल्याचे एका नवीन अभ्यासात सिद्ध झाले आहे. या क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे भूकंपप्रवण भागातील कोट्यवधी लोकांना भूकंपाचा धक्का बसण्यापूर्वी काही सेकंद आधीच धोक्याचा इशारा मिळवणे शक्य झाले आहे.
गुगलच्या ‘अँड्रॉईड अर्थक्वेक अलर्ट’ (AEA) या प्रणालीने 2021 ते 2024 या काळात स्मार्टफोनमधील ‘अॅक्सेलरोमीटर’ (Accelerometer) या सेन्सरच्या मदतीने तब्बल 11,000 हून अधिक भूकंपांची नोंद केली. या माहितीच्या आधारे 98 देशांतील अँड्रॉईड वापरकर्त्यांना 1,200 हून अधिक वेळा धोक्याचा इशारा पाठवण्यात आला. या प्रणालीमुळे जगभरात भूकंप सूचना मिळवणार्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. 2019 मध्ये केवळ 25 कोटी लोकांना ही सुविधा उपलब्ध होती.आज ही संख्या तब्बल 2.5 अब्ज लोकांपर्यंत पोहोचली आहे, म्हणजेच यात दहापटीने वाढ झाली आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष 17 जुलै रोजी ‘सायन्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
गुगलच्या प्रतिनिधींनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘भूकंप हा जगभरातील समाजासाठी एक सततचा धोका आहे. तो कुठे येऊ शकतो याचा अंदाज आपण लावू शकतो, पण जेव्हा तो येतो तेव्हा होणारे नुकसान विनाशकारी असते. विचार करा, भूकंपाचा धक्का बसण्यापूर्वी काही सेकंदांचा इशारा मिळाला तर? ते काही सेकंद एखाद्या व्यक्तीला शिडीवरून खाली उतरण्यासाठी, धोकादायक वस्तूंपासून दूर जाण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. ‘चीन, मेक्सिको, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये भूकंप सूचना प्रणाली कार्यान्वित आहेत. मात्र, या प्रणाली भूकंपाची नोंद करणार्या केंद्रांवर (Seismic Stations) अवलंबून असतात, ज्या अत्यंत महागड्या आहेत. त्यामुळे अनेक भूकंपप्रवण देशांमध्ये या प्रणाली केवळ काही भागांपुरत्या मर्यादित आहेत, तर अनेक देशांमध्ये त्या उपलब्धच नाहीत. हीच उणीव भरून काढण्यासाठी गुगलने AEA प्रणालीची रचना केली आहे.
ही प्रणाली स्मार्ट फोन आणि स्मार्टवॉचमधील अॅक्सेलरोमीटर सेन्सरचा वापर करते. भूकंपादरम्यान, विनाशकारी ‘S-लहरीं’च्या ( S- waves) आधी वेगवान ‘P-लहरी’ (P- waves) जमिनीवर पोहोचतात. ही प्रणाली नेमक्या याच P-लहरी ओळखते. या सेन्सर नेटवर्कच्या मदतीने, AEA प्रणाली भूकंपाची तीव्रता आणि त्याचे केंद्रस्थान यांचा अंदाज घेते आणि धोकादायक क्षेत्रातील वापरकत्र्यांना त्वरित त्यांच्या फोनवर धोक्याचा इशारा पाठवते. थोडक्यात, गुगलने तंत्रज्ञानाचा वापर केवळ व्यावसायिक फायद्यासाठी न करता, ते मानवी जीवनाच्या सुरक्षेसाठी कसे वापरता येईल, याचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.