

बीजिंग : चीनने ‘ड्रोन मदरशिप’ म्हणून ओळखल्या जाणार्या जगातील सर्वात मोठ्या ड्रोन कॅरिअरचे जूनअखेरीस तैनातीसाठी नियोजन केले आहे. हा प्रगत विमानवाहू ड्रोन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला लढाई, हेरगिरी, आपत्कालीन बचावकार्य यांसारख्या विविध मोहिमांसाठी ड्रोनच्या झुंडी (swarms) उड्डाणासाठी अधिक क्षमता प्रदान करणार आहे. या ड्रोन कॅरिअरचे नाव ‘जिऊ तियान’ असे आहे.
या ड्रोन कॅरिअरची ही काही वैशिष्ट्ये- वजन : 11 टन (सुमारे 10 मेट्रिक टन), वाहून नेण्याची क्षमता : 100 लहान ड्रोन, एकत्रित वजन सुमारे 6.6 टन (6 मेट्रिक टन), अधिकतम श्रेणी : 4,350 मैल (सुमारे 7,000 किलोमीटर), प्रकार : मानवरहित हवाई वाहन (UAV), सादरीकरण : नोव्हेंबरमध्ये झुहाई एअर शोमध्ये. याचा संभाव्य वापर असा : कमिकाझे ड्रोन (Loitering Munitions) : हे लक्ष्य गवसल्यावर त्यांच्यावर आदळून स्फोट घडवून आणणारे ड्रोन आहेत. झुंडीने आक्रमण : समन्वयित स्वार्म टेक्नॉलॉजीचा वापर करून डझनभर ड्रोन एकत्रितपणे हल्ला करू शकतात.
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टच्या (SCMP) अहवालानुसार, हे ड्रोन झुंडीने आक्रमण करून शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टीमला भेदण्याची क्षमता बाळगतात. एका ड्रोनवर भर न देता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ‘मशिन लर्निंग’च्या सहाय्याने हे ड्रोन आपसांत समन्वय साधू शकतात, अडथळ्यांना चुकवू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपासही प्रतिसाद देऊ शकतात. याबाबत जगातून चिंताही व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या मरीन कॉर्प्स सिस्टीम्स कमांडचे प्रमुख कर्नल अँड्र्यू कोनिकी म्हणाले, ‘मला सगळ्यात जास्त चिंता देणारी गोष्ट म्हणजे ड्रोन स्वार्म्स.’