

पुरी : ओडिशातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बुधवारी नाताळच्या पूर्वसंध्येला पुरी येथील नीलाद्री बीचवर एक आगळेवेगळे शिल्प साकारले आहे. त्यांनी सुमारे 1.5 टन सफरचंद आणि वाळूचा वापर करून 60 फूट लांब, 22 फूट उंच आणि 45 फूट रुंद अशा भव्य सांता क्लॉजच्या मूर्तीची निर्मिती केली आहे.
सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या सँड आर्ट इन्स्टिट्यूटच्या 30 विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ही कलाकृती पूर्ण केली. पुरी सँड आर्ट फेस्टिव्हलच्या 22 व्या आवृत्तीअंतर्गत ही कलाकृती साकारण्यात आली आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी नाताळच्या पूर्वसंध्येला हे शिल्प पूर्ण करून त्यांनी एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सफरचंद आणि वाळूच्या साहाय्याने बनवलेली ही सांता क्लॉजची जगातील सर्वात मोठी प्रतिमा ठरली आहे.
सुदर्शन पटनायक यांनी सांगितले की, हे शिल्प आकर्षक बनवण्यासाठी तब्बल 1.5 टन सफरचंदांचा वापर करण्यात आला आहे. ही भव्य कलाकृती पाहण्यासाठी पर्यटकांनी नीलाद्री बीचवर मोठी गर्दी केली आहे. सुदर्शन पटनायक यांच्या वाळूच्या अनेक कलाकृती यापूर्वीही देश-विदेशात लोकप्रिय ठरलेल्या आहेत.