

रियाध : दुसऱ्या देशात किंवा राज्यात कमी वेळेत प्रवास करण्यासाठी हवाई मार्ग हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी भारतासह जगभरात अनेक विमानतळ उभारण्यात आले आहेत. प्रत्येक विमानतळाचे काही ना काही वेगळे वैशिष्ट्य असते. पण, तुम्हाला जगातील अशा सर्वात मोठ्या विमानतळाबद्दल माहिती आहे का, जो आपल्या आकारामुळे एखाद्या लहान शहरासारखा दिसतो? हा विमानतळ इतका विशाल आहे की, त्याच्यासमोर दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता यांसारखी शहरेही लहान वाटू लागतात. या अवाढव्य आकारामुळे या विमानतळाला ‘विमान क्षेत्रातील महाकाय’ (Aviation Giant) असेही म्हटले जाते.
हे विमानतळ सौदी अरेबियाच्या ईस्टर्न प्रॉव्हिन्समध्ये दम्मामजवळ स्थित असून याचे नाव ‘किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे आहे. एकूण जमिनीच्या क्षेत्रफळानुसार हा जगातील सर्वात मोठा विमानतळ मानला जातो. सुमारे ७७६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला हा विमानतळ १९९९ मध्ये व्यावसायिक सेवेसाठी खुला करण्यात आला होता. हे विमानतळ इतके अवाढव्य आहे की, यात बहरीनसारखा अख्खा देश (७२७ चौरस कि.मी.) सहज सामावून जाऊ शकतो. इतकेच नाही तर भारताची आर्थिक राजधानी मुंबईचे (६०३ चौरस कि.मी.) क्षेत्रफळही या विमानतळाच्या परिसरात ठेवले, तरीही बरीच जागा रिकामी राहील! या अवाढव्य आकारामुळेच या विमानतळाची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे.
विमानतळांच्या जगातील ‘राजा’ असूनही, प्रवाशांच्या रहदारीच्या बाबतीत हा जगातील अव्वल विमानतळांमध्ये येत नाही. या ७७६ चौरस कि.मी.च्या अथांग विस्तारापैकी अत्यंत लहान भाग हा पॅसेंजर टर्मिनल्स, रनवे (धावपट्टी) आणि नियमित सेवांसाठी वापरला जातो. उर्वरित बहुतांश भाग आजही भविष्यातील विकास आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोकळी वाळवंटी जमीन म्हणून ठेवण्यात आला आहे. जगभरात सामान्यतः आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विमानतळांचा विस्तार केला जातो. मात्र, १९९९ मध्ये सुरू झालेल्या या विमानतळाचे नियोजन काही वेगळेच होते.
भविष्यातील अनेक दशकांच्या गरजा लक्षात घेऊनच याची रचना करण्यात आली होती. याच कारणामुळे सुरुवातीलाच ७७६ चौरस कि.मी.ची जमीन राखीव ठेवण्यात आली, जेणेकरून भविष्यात अतिरिक्त रनवे, विशाल कार्गो हब, टर्मिनल विस्तार आणि लॉजिस्टिक्स सुविधा सहजरीत्या विकसित करता येतील. जर या विमानतळाकडे आकाशातून पाहिले, तर विशाल वाळवंटाच्या मध्यभागी वसलेले एक ‘लहान शहर’ असल्याचा भास होतो. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात मोठा मानला जाणारा अमेरिकेचा ‘डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ देखील याच्या आकारासमोर लहान दिसतो.