Largest Active Volcano | सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी बदलतोय हवाईचा नकाशा

75,000 घन कि.मी. लाव्हाचा साठा!
Largest Active Volcano |
Largest Active Volcano | सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी बदलतोय हवाईचा नकाशा
Published on
Updated on

होनोलुलू : हवाई बेटावरील प्रसिद्ध ‘मौना लोआ’ हा वस्तुमान आणि आकाराच्या द़ृष्टीने पृथ्वीवरील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. हा महाकाय ज्वालामुखी त्याच्या प्रवाही ‘बेसाल्टिक’ उद्रेकांमुळे शेकडो-हजारो वर्षांपासून हवाईचा भूप्रदेश सातत्याने बदलत आहे. यूएस जीएस (USGS - युनायटेड स्टेटस् जिओलॉजिकल सर्व्हे) च्या अहवालानुसार, मौना लोआ हा जगातील इतर कोणत्याही ज्वालामुखीपेक्षा आकाराने अत्यंत विशाल आहे.

जरी हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून 4 किमी (2.5 मैल) उंच दिसत असला, तरी त्याचा खरा विस्तार समुद्राच्या तळाशी लपलेला आहे. याचा समुद्राखालील भाग तब्बल 5 किमी (3 मैल) खाली समुद्राच्या तळापर्यंत जातो. मौना लोआच्या अवाढव्य वजनामुळे समुद्राचा तळ आणखी 8 किमी (5 मैल) खाली दबला गेला आहे. जर या ज्वालामुखीच्या मूळ तळापासून मोजले, तर याची एकूण उंची तब्बल 17 किमी (10.5 मैल) भरते. म्हणजेच, मूळ तळापासून मोजल्यास हा ज्वालामुखी जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’पेक्षाही खूप उंच आहे.

मौना लोआचा एकूण आकार सुमारे 75,000 घन किलोमीटर (18,000 क्युबिक मैल) खडकांचा असल्याचा अंदाज आहे. हा ज्वालामुखी हवाई बेटाचा तब्बल 51 टक्के भाग (5,000 पेक्षा जास्त चौरस किमी क्षेत्रफळ) व्यापतो. हवाईयन ज्वालामुखींच्या वैशिष्ट्यानुसार, यात मोठे भीषण स्फोट होत नाहीत, तर संथ गतीने वाहणारा लाव्हा बाहेर पडतो. यामुळे याला घुमटासारखा विस्तीर्ण आकार प्राप्त झाला आहे. या ज्वालामुखीचा इतिहास अत्यंत सक्रिय राहिला आहे. 1843 पासून आतापर्यंत मौना लोआचा 34 वेळा उद्रेक झाला आहे.

1950 पूर्वी दर 3.5 वर्षांनी याचा उद्रेक होत असे. याचा सर्वात शेवटचा उद्रेक नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये झाला होता. याच्या शिखरावर 6 चौरस किमी आकाराचे एक मोठे विवर (कॅल्डेरा) आहे, जे उद्रेकादरम्यान लाव्हाच्या तलावाने पूर्णपणे भरून जाते. मौना लोआचा हवाई बेटावरील हवामान, परिसंस्था आणि मानवी वस्त्यांवर मोठा प्रभाव पडतो. याच्या अवाढव्य वजनामुळे पॅसिफिक महासागराचा तळ अनेक किलोमीटर खाली खचला आहे. या ज्वालामुखीमुळे आसपासच्या परिसराला लाव्हाचे लोंढे, वारंवार होणारे भूकंप आणि ‘व्हॉग’ (Vog - म्हणजेच ज्वालामुखीमुळे पसरणारे विषारी धुके) अशा मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news