Worlds Highest Shrikrishna Temple | जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर

worlds highest shrikrishna temple
Worlds Highest Shrikrishna Temple | जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिरPudhari File Photo
Published on
Updated on

शिमला : हिमाचल प्रदेशची ओळख ‘देवभूमी’ म्हणून जगभर आहे. येथील देवी-देवता आणि निसर्गरम्य वातावरण या भूमीला पवित्र बनवते. याच देवभूमीत एक असे पवित्र कृष्ण मंदिर आहे, जे जगातील सर्वाधिक उंचीवरील श्रीकृष्ण मंदिर मानले जाते. या मंदिराशी एक अशी अनोखी परंपरा जोडलेली आहे, जिथे भक्तांचे भाग्य एक ‘टोपी’ ठरवते!

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील ‘युला कांडा’ येथे एका तलावाच्या मधोमध भगवान श्रीकृष्णाचे हे छोटेखानी मंदिर वसलेले आहे. असे मानले जाते की, पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात या मंदिराची स्थापना केली होती. जन्माष्टमीच्या एक दिवस आधी भाविक दूरदूरवरून युला कांडा येथे पोहोचतात. मंदिर समितीकडून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून तब्बल 12,000 फूट उंचीवर आहे. या प्राचीन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 14 किलोमीटरचा दुर्गम प्रवास पायी करावा लागतो. भगवान श्रीकृष्णाच्या या मंदिरापर्यंतचा रस्ता खडतर असला, तरी भक्तांची अढळ श्रद्धा हा प्रवास सोपा करते. युला कांडा येथील जन्माष्टमी उत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे.

या उत्सवाचा इतिहास ‘बुशहर’ संस्थानाशी जोडलेला आहे. असे मानले जाते की, बुशहर संस्थानाचे तत्कालीन राजा केहरी सिंह यांच्या काळात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्या काळात लहान स्तरावर साजरा होणार्‍या या उत्सवाला आज जिल्हास्तरीय दर्जा मिळाला आहे. मात्र, हा मेळा साजरा करण्याची परंपरा आजही शतकानुशतके जुनी आहे. हा उत्सव पाहण्यासाठी स्थानिक गावकर्‍यांसोबतच बाहेरून आलेल्या पर्यटकांचीही मोठी गर्दी होते. या मंदिराची सर्वात खास आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथील परंपरा. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिराशेजारी असलेल्या पवित्र तलावात ‘किन्नौरी टोपी’ उलटी करून सोडली जाते.

जर ही टोपी न बुडता तरंगत दुसर्‍या किनार्‍यापर्यंत पोहोचली, तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आणि तुमचे भाग्य उजळणार, असे मानले जाते. येणारे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे असेल, असा हा संकेत असतो. मात्र, जर टोपी तलावात बुडाली, तर येणारे वर्ष कष्टदायक असू शकते किंवा तुमच्यावर काही संकट येणार आहे, असा अशुभ संकेत मानला जातो. विशेष म्हणजे, आपले नशीब आजमावण्यासाठी येथे केवळ किन्नौरच नव्हे, तर शिमला आणि इतर जिल्ह्यांतील लोकही मोठ्या श्रद्धेने येतात. तसेच, या तलावाची परिक्रमा केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात, अशीही मान्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news