

नवी दिल्ली : समुद्रसपाटीपासून तब्बल ५,२५६ मीटर म्हणजे १७,२४४ फूट उंचावर भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन उभारण्याची तयारी सुरू आहे. भारत हिमालयाच्या कुशीत आपल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाची योजना आखत असून, त्याअंतर्गत लडाखमधील या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे.
हिमाचल प्रदेशातील बिलासपूरला लडाखमधील लेहशी जोडणारी ही प्रस्तावित रेल्वे लाईन भारतीय रेल्वेला देशाच्या उत्तर सीमेच्या अधिक जवळ नेईलच, शिवाय एक नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित करेल. ४८९ किलोमीटर लांबीच्या बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईनवर समुद्रसपाटीपासून सुमारे ५,२५६ मीटर (१७,२४४ फूट) उंचीवर हे रेल्वे स्टेशन बांधले जाण्याची शक्यता आहे. लडाखमधील हे प्रस्तावित रेल्वे स्टेशन इतक्या प्रचंड उंचीवर उभारले गेल्यास ते जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन ठरेल. यासोबतच ते चीनच्या ‘तंगगुला’ रेल्वे स्टेशनचा विक्रम मोडीत काढेल. चीनचे तंगगुला स्टेशन सध्या ५,०६८ मीटर उंचीवर असून, त्याच्या नावावर जगातील सर्वात उंच स्टेशनचा विक्रम आहे.
एका अहवालानुसार, या प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉरचे मुख्य आकर्षण म्हणजे लडाखमधील ‘तंगलांग ला’ दरीच्या खाली बनणारे स्टेशन हे असेल. हे प्रस्तावित स्टेशन चीनच्या छिंगहाई-तिबेट रेल्वेवरील तंगगुला स्टेशनपेक्षा तब्बल १८८ मीटर अधिक उंचावर असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) देखील तयार केला आहे. या अहवालानुसार, या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १.३१ लाख कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या अंतिम मंजुऱ्या मिळणे अजून बाकी आहे.