वॉशिंग्टन : जगातील पहिले लाकडी सॅटेलाईट गेल्या मंगळवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कार्गो कॅप्सूलमधून जपानचे हे लाकडी सॅटेलाईट तिथे पाठवण्यात आले. या सॅटेलाईटचे नाव ‘लिग्नोसॅट’ असे आहे. त्याची प्रत्येक बाजू 4 इंच म्हणजेच दहा सेंटिमीटरची आहे.
नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन प्रोग्रॅमच्या डेप्युटी चीफ सायंटिस्ट मेघन इव्हेरेट यांनी सांगितले की, असे लाकडी सॅटेलाईट हे अधिक किफायतशीर व पर्यावरणपूरक ठरू शकतात. त्यांच्यामुळे पारंपरिक सॅटेलाईटच्या तुलनेत प्रदूषण होण्याची शक्यता नाही. नेहमीचे सॅटेलाईटस् हे अॅल्युमिनियमपासून बनवलेले असतात. ज्यावेळी त्यांचे आयुष्य संपते व ते पाडले जातात त्यावेळी ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळतात आणि त्यांच्यापासून अॅल्युमिनिअम ऑक्साईड बनते. त्याच्यापासून पृथ्वीच्या औष्णिक संतुलन व संरक्षक अशा ओझोन स्तराला धोका संभवतो. आता पृथ्वीच्या भोवती अशा सॅटेलाईटस्ची संख्या प्रचंड वाढलेली असल्याने त्यांच्या प्रदूषणाचा धोकाही वाढला आहे. ‘स्पेस एक्स’च्या स्टारलिंक कार्यक्रमात तर असे हजारो सॅटेलाईटस् सोडले जात आहेत. सध्या या मोहिमेत सुमारे 6500 सॅटेलाईटस् कार्यरत आहेत. विविध देशांनी आजपर्यंत सोडलेले सॅटेलाईटस् तर वेगळेच! जपानने बनवलेल्या लिग्नोसॅट सॅटेलाईटमुळे अशा प्रदूषणाचा धोका नाही. हे सॅटेलाईट बनवण्यासाठी अॅल्युमिनिअमऐवजी मॅग्नोलिया लाकडाचा वापर केला आहे. जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक व निवृत्त अंतराळवीर ताकाओ दोई यांनी म्हटले आहे की भविष्यात धातूपासून बनवलेले सॅटेलाईटस् सोडण्यास बंदी घातली पाहिजे. जर हे पहिले लाकडी सॅटेलाईट नेहमीच्या सॅटेलाईटप्रमाणेच उत्तमरीत्या काम करते हे सिद्ध झाले तर एलन मस्क यांच्या स्पेस एक्सनेही त्याचा कित्ता गिरवावा.