Gorilla Skull Surgery | जगात प्रथमच गोरिलाच्या कवटीवर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉक्टरांनी काढले प्राणघातक इन्फेक्शन
 Gorilla skull surgery |
Gorilla skull surgery | जगात प्रथमच गोरिलाच्या कवटीवर यशस्वी शस्त्रक्रिया
Published on
Updated on

सॅन डिएगो (अमेरिका) : वैद्यकीय विज्ञानाच्या जगतात एक असा चमत्कार घडला आहे, ज्याने सर्वांनाच थक्क केले आहे. सॅन डिएगो झू सफारी पार्कमध्ये राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या गोरिलाच्या कवटीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोरिलाच्या प्रजातीमध्ये अशा प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

‘मिजानी’ नावाच्या या नराच्या कानाच्या ठीक मागच्या हाडात एक प्राणघातक इन्फेक्शन (संसर्ग) झाले होते, जे हळूहळू त्याच्या खोपडीपर्यंत पसरले होते. जर योग्य वेळी यावर उपचार झाले नसते, तर मिजानीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. ही संपूर्ण कहाणी मार्च २०२६ मध्ये सुरू झाली. सॅन डिएगो सफारी पार्कमध्ये मिजानीची काळजी घेणाऱ्या तज्ज्ञांना त्याच्या वर्तनात काही बदल झाल्याचे जाणवले. त्याला त्याचे तोंड पूर्णपणे उघडता येत नव्हते आणि त्याने खाणेही खूप कमी केले होते. एवढेच नाही तर मिजानी वारंवार आपल्या डोक्याला हात लावायचा आणि डोळे मिचकावायचा, ज्यावरून त्याला डोक्यात तीव्र वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. जेव्हा त्याचा त्रास खूप वाढला, तेव्हा डॉक्टरांनी पार्कच्या प्राणी रुग्णालयात त्याचा सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला.

सीटी स्कॅनचा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरही चक्रावून गेले. मिजानीला सायनुसायटिससह ‘मास्टोइडिटिस’ नावाचा आजार झाला होता. हा एक असा संसर्ग आहे जो कानाच्या मागच्या मोठ्या हाडाला नुकसान पोहोचवतो. माणसांमध्ये हा आजार आढळतो; परंतु गोरिला किंवा मोठ्या वानरांच्या प्रजातीत असा प्रकार यापूर्वी कधीही ऐकायला मिळाला नव्हता. हे इन्फेक्शन मिजानीच्या खोपडीच्या भागांमध्ये पसरल्यामुळे डॉक्टरांसमोर शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. वैद्यकीय इतिहासात यापूर्वी कोणत्याही गोरिलावर अशी शस्त्रक्रिया झाल्याची नोंद नसल्यामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक होते. हे अशक्य काम शक्य करण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या डॉक्टरांनी आणि ‘यूसी सॅन डिएगो हेल्थ’च्या मानवावर शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन्सनी एकत्र येत एक विशेष टीम तयार केली. या टीममध्ये डॉ. जेफ्री हॅरिस आणि डॉ. क्रिस सुरेश यांच्यासारख्या दिग्गज सर्जन्सचा समावेश होता, ज्यांना मानवी डोके आणि कानाच्या शस्त्रक्रियेचा मोठा अनुभव आहे.

जरी गोरिला आणि मानवी शरीराच्या रचनेत बरेच साम्य असले, तरी त्यांच्या हाडांचा ढाचा वेगळा असतो. त्यामुळे डॉक्टरांनी सीटी स्कॅनचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून एक नवीन कार्यपद्धती तयार केली. शस्त्रक्रियेच्या दिवशी २० हून अधिक तज्ज्ञांची टीम मिजानीवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली होती. डॉक्टरांनी मिजानीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला शस्त्रक्रियेसाठी छेद दिला आणि इन्फेक्शन झालेल्या भागापर्यंत पोहोचले. अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी खराब झालेले हाड आणि उती बाहेर काढले आणि जखम स्वच्छ करून टाके घातले. मिजानीला भूल देण्यापासून ते तो शुद्धीवर येईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे ५ तासांचा वेळ लागला. मानवी डॉक्टरांचा अनुभव आणि पशुवैद्यकीय टीमचे कौशल्य यामुळे ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून, मिजानीची प्रकृती आता सुधारत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news