
वॉशिंग्टन : ब्लॅडर म्हणजेच मूत्राशय हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. याचे प्रमुख कार्य म्हणजे मूत्र साठवून ठेवणे. जसजसे मूत्र भरत जाते, तसतसा हा अवयव फुगवटा घेत फुग्यासारखा सारखा वाढतो; पण जर ब्लॅडरमध्ये समस्या निर्माण झाली, तर दैनंदिन आयुष्यातील साध्यासोप्या कृतींसुद्धा कठीण होऊ शकतात. ब्लॅडर ट्रान्सप्लांट करणे हे वैद्यकीयद़ृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे मानले जाते; मात्र, ‘यूसीएलए हेल्थ’ आणि ‘केक मेडिसिन युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ येथील डॉक्टरांनी यामध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यांनी जगातील पहिला यशस्वी मानवी ब्लॅडर ट्रान्सप्लांट केला आहे. ही क्रांतिकारी सर्जरी गंभीर ब्लॅडर डिसफंक्शन असलेल्या आणि दीर्घकाळापासून किडनी फेल्युअरमुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांसाठी एक नवा आशेचा किरण घेऊन आली आहे.
ही अत्यंत जटिल सर्जरी ‘यूएससी इन्स्टिट्यूट ऑफ युरॉलॉजी’चे संस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉ. नीमा नासिरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये एकाच डोनरकडून नवीन मूत्रपिंड आणि नवीन ब्लॅडर दोन्हींचं प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्ण हा 41 वर्षांचा एक पुरुष होता. एका ट्यूमरमुळे झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा बहुतांश ब्लॅडर काढून टाकावा लागला होता. त्यानंतर त्याला कर्करोग झाला आणि नंतरच्या टप्प्यातील किडनी फेल्युअर झाल्यामुळे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. परिणामी, तो सात वर्षांपासून डायलिसिसवर अवलंबून होता. पूर्वी ब्लॅडर पुनर्रचनेसाठी डॉक्टर आतड्याच्या टिशूचा म्हणजेच पेशींचा समूह असलेल्या ऊतीचा वापर करत असत; मात्र आतड्याचे ऊतक मूत्रातील टाकाऊ घटक शोषून घेतात आणि अशा वेळी किडनीवर अधिक ताण येतो, विशेषतः ज्यांची मूत्रपिंड आधीच कमकुवत आहेत.
नवीन ट्रान्सप्लांटेड ब्लॅडर मात्र मूळ ब्लॅडरसारखे काम करते, कोणतीही शोषण प्रक्रिया न करता लघवी साठवते आणि बाहेर टाकते. त्यामुळे कमकुवत किडनी असलेल्या रुग्णांसाठी हे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. शस्त्रक्रियेनंतर नवीन प्रत्यारोपित मूत्रपिंडाने लगेचच मोठ्या प्रमाणात लघवी निर्माण करायला सुरुवात केली. यामुळे रुग्णाचे मूत्रपिंडाचे कार्य चांगलेच सुधारले आणि डायलिसिसची गरज पूर्णतः संपली. जरी प्रत्यारोपित ब्लॅडरचे स्नायू काही प्रमाणात मर्यादित काम करू शकतात, तरीही यशस्वी नसांचा आणि रक्तवाहिन्यांचा संपर्क हे या सर्जरीच्या यशामागचं गुपित आहे. हा जगातील पहिलाच यशस्वी ब्लॅडर ट्रान्सप्लांट वैद्यकीय क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. त्यामुळे भविष्यात अशा गुंतागुंतीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना नवीन आयुष्य मिळू शकते.