

वॉशिंग्टन : विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, आता आकाशातील तार्यांकडे फक्त पाहणेच नाही, तर तिथे जाऊन राहणेही शक्य होणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ आणि काही खासगी कंपन्यांच्या सहकार्याने जगातील पहिले अंतराळ हॉटेल ‘व्हॉयेजर क्लास स्पेस स्टेशन’ 2027 पर्यंत पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
हे हॉटेल एखाद्या मोठ्या चक्रासारखे दिसेल, जे अंतराळात सतत फिरत राहील. या फिरण्यामुळे तिथे ‘कृत्रिम गुरुत्वाकर्षण’ निर्माण होईल, ज्यामुळे पर्यटकांना चंद्रावर असल्यासारखा अनुभव येईल. म्हणजेच, पृथ्वीसारखे पूर्ण गुरुत्वाकर्षण नसले, तरी तुम्ही तिथे हवेत तरंगण्याऐवजी जमिनीवर चालू शकाल. या हॉटेलमध्ये एकावेळी 400 हून अधिक पाहुणे राहू शकतील. यात केवळ राहण्याची सोय नाही, तर जिम, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आणि बार अशा पंचतारांकित सुविधा असतील. हॉटेलच्या खिडकीतून पर्यटकांना पृथ्वीचे मनमोहक द़ृश्य आणि सूर्यास्त-सूर्योदयाचा अनोखा नजारा पाहायला मिळेल.
हे अनुभवणे जितके रोमांचक आहे, तितकेच ते महागडेही असणार आहे. सुरुवातीला या सहलीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. मात्र, तंत्रज्ञान स्वस्त झाल्यावर भविष्यात हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असा दावा ‘ऑर्बिटल असेंब्ली’ या कंपनीने केला आहे. आतापर्यंत अंतराळात फक्त शास्त्रज्ञ आणि अंतराळवीर जात असत. मात्र, या हॉटेलमुळे अंतराळ पर्यटनाचे एक नवीन दालन उघडले जाणार आहे. पृथ्वीवरच्या प्रदूषणापासून आणि गर्दीपासून दूर, तार्यांच्या दुनियेत सुट्ट्या घालवण्याचे मानवाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे. हे ‘स्पेस स्टेशन’ पृथ्वीभोवती दर 90 मिनिटाला एक प्रदक्षिणा पूर्ण करेल, म्हणजेच पाहुण्यांना 24 तासांत अनेक वेळा सूर्योदय पाहता येईल!