न्यूयॉर्क : आज रस्त्यांवर धावणार्या हाय-स्पीड आणि स्टायलिश बाईक्स पाहून कोणाचेही डोळे दिपून जातात. मात्र, या वेगवान प्रवासाची सुरुवात एका लाकडी सांगाड्यापासून आणि वाफेवर चालणार्या इंजिनापासून झाली होती, हे ऐकून नवल वाटेल. जगातील पहिल्या मोटारसायकलचा शोध आणि तिचा प्रवास विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जगातील पहिल्या ‘पेट्रोल’वर चालणार्या मोटारसायकलचा शोध जर्मन संशोधक गोटलिब डेमलर आणि विल्हेल्म मेबॅक यांनी लावला. त्यांनी 1885 मध्ये ही मोटारसायकल तयार केली होती. या ऐतिहासिक दुचाकीला त्यांनी ‘डेमलर रेंटवागन’ असे नाव दिले होते, ज्याचा अर्थ ‘सवारी करण्याची गाडी’ असा होतो.
आजच्या अलॉय व्हील्स आणि कार्बन फायबरच्या जमान्यात पहिली मोटारसायकल कशी होती, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या मोटारसायकलचे संपूर्ण स्ट्रक्चर आणि चाके लाकडापासून बनवलेली होती. चाकांवर लोखंडी पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या. यात 0.5 अश्वशक्तीचे (एचपी) सिंगल सिलिंडर इंजिन वापरण्यात आले होते. या गाडीचा कमाल वेग ताशी केवळ 12 किलोमीटर इतका होता. तोल सांभाळण्यासाठी या गाडीला आजच्या मुलांच्या सायकलींप्रमाणे बाजूला दोन छोटी चाके लावलेली होती.
10 नोव्हेंबर 1885 रोजी गोटलिब डेमलर यांचा मुलगा पॉल डेमलर याने या गाडीची पहिली अधिकृत चाचणी घेतली. त्याने दक्षिण जर्मनीतील कॅनस्टॅट ते अनटर्टुरखेम दरम्यान सुमारे 5.5 किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले. हा प्रवास जगासाठी एका नव्या युगाची सुरुवात करणारा ठरला. डेमलरच्या पेट्रोल इंजिनपूर्वीही काही प्रयत्न झाले होते. 1867 मध्ये अमेरिकेच्या सिल्व्हर सॅलवेस्टर रोपर यांनी वाफेवर चालणारी दुचाकी तयार केली होती. मात्र, व्यावसायिक द़ृष्टिकोनातून आणि इंधनाच्या वापरातून यशस्वी झालेली पहिली खरी मोटारसायकल म्हणून ‘डेमलर रेंटवागन’चेच नाव घेतले जाते. दुर्दैवाने, 1885 मध्ये बनवण्यात आलेली मूळ ‘डेमलर रेंटवागन’ 1903 मध्ये लागलेल्या एका आगीत नष्ट झाली. मात्र, तिची हुबेहूब प्रतिकृती आजही जर्मनीतील म्युनिक येथील ‘ड्यूश म्युझियम’मध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.