

रोम : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक मोठी क्रांती झाली आहे. इटलीच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच मानवासारख्या दिसणार्या (ह्युमनॉईड) रोबोला यशस्वीरीत्या हवेत उडवून दाखवले आहे. ‘आय-रॉनकब एमके 3’ नावाचा हा रोबो भविष्यात केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः शोध आणि बचाव मोहिमांमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतो.
इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT) संशोधकांनी हा अनोखा रोबो विकसित केला आहे. एखाद्या लहान मुलाच्या आकाराचा, म्हणजे सुमारे 3 फूट उंच आणि 22 किलो वजनाचा हा रोबो दिसायला अतिशय आकर्षक आहे. या रोबोच्या हातांमध्ये आणि पाठीवर लावलेल्या जेटपॅकमध्ये एकूण चार थ्रस्टर्स बसवण्यात आले आहेत. याच थ्रस्टर्सच्या मदतीने तो जमिनीवरून सरळ हवेत झेप घेऊ शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडीओमध्ये हा रोबो जमिनीपासून सुमारे 20 इंच वर उडताना दिसत आहे.
आतापर्यंत विकसित झालेले बहुतेक रोबो जमिनीवर चालण्यापुरते किंवा वस्तू उचलण्यापुरते मर्यादित होते. मात्र, ‘आय-रॉनकब एमके 3’ हवेत उडू शकत असल्याने त्याच्या कार्यक्षमतेत अफाट वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा रोबो अनेक अशक्य वाटणारी कामे सहज करू शकेल. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारती, पूरग्रस्त किंवा मानवाला पोहोचण्यास कठीण असलेल्या ठिकाणी हा रोबो पोहोचून ढिगारा बाजूला करू शकतो. तसेच, अडकलेल्या लोकांना शोधून त्यांना बाहेर काढण्यासही मदत करू शकतो.
अणुभट्टी किंवा रासायनिक गळती झालेल्या धोकादायक ठिकाणी, जिथे माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो, तिथे हा रोबो दुरुस्तीची किंवा पाहणीची कामे सुरक्षितपणे करू शकतो. उंच पूल किंवा इमारतींच्या अशा भागांमध्ये जिथे पोहोचणे अवघड असते, तिथे दुरुस्तीची कामे करण्यासाठी या रोबोचा प्रभावीपणे वापर करता येईल. या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात तंत्रज्ञान मानवासाठी किती उपयुक्त ठरू शकते, याचा एक उत्तम नमुना जगासमोर आला आहे. या शोधामुळे केवळ रोबोटिक्स क्षेत्रातच नव्हे, तर आपत्कालीन व्यवस्थापन आणि औद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रातही एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.