

क्विटो (इक्वाडोर) : लॅब आणि फॅक्टरींमधून बाहेर पडून आता रोबोंनी नवा इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. माणसासारख्या दिसणाऱ्या एका ‘ह्युमनॉईड रोबो’ने इक्वाडोरमधील ‘चिंबोराजो’ या सक्रिय ज्वालामुखीच्या शिखरावर यशस्वी चढाई करून इतिहास रचला आहे. हे यश तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानले जात असून, भविष्यात मशिन आणि मानव खांद्याला खांदा लावून काम करतील याचा हा एक उत्तम पुरावा आहे. ‘पेम्बा’ नावाच्या या रोबोने मानवी पथकाच्या मदतीने हा प्रवास पूर्ण केला असून, आता त्याला जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’वर पाठवण्याची तयारी सुरू आहे.
दुर्गम आणि अत्यंत धोकादायक भागांमध्ये, जिथे मानवी जीवाला मोठा धोका असतो, तिथे रोबो कितपत उपयुक्त ठरू शकतात, हे तपासणे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’च्या अहवालानुसार, चिंबोराजो ज्वालामुखीच्या शिखरावर चढाई करणाऱ्या या रोबोचे नाव ‘पेम्बा’ ठेवण्यात आले आहे. त्याने समुद्रसपाटीपासून तब्बल ६,२०० मीटर उंच असलेल्या ज्वालामुखीच्या शिखरावर चढाई केली. हा रोबो मूळचा चीनमध्ये तयार होणाऱ्या प्रसिद्ध ‘Unitree G1’ या ह्युमनॉईड रोबोची सुधारित आवृत्ती आहे. सध्या जगभरात या ‘यूनिट्री’ रोबोची मागणी सातत्याने वाढत आहे. दरवर्षी जगभरात पर्वतारोहणाच्या अनेक मोहिमा आखल्या जातात. अशा ठिकाणी जिथे वाहने किंवा मोठी यंत्रे पोहोचू शकत नाहीत, तिथे हे रोबो पोहोचून मानवी जीवाची सुरक्षा आणि मदतीचे काम करू शकतील.
जंगलांची बेसुमार कत्तल आणि प्राण्यांची होणारी अवैध शिकार रोखण्यासाठी भविष्यात हे रोबो अत्यंत उपयुक्त ठरतील. जंगलात गस्त घालण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. जर या रोबोंना एआय आणि सॅटेलाईट इंटरनेटशी जोडले गेले, तर माणूस घरात बसूनच जगातील कोणत्याही दुर्गम भागाचे सर्वेक्षण करू शकेल. या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचे नेतृत्व ‘जिओलॉजिक डोम’चे संस्थापक आणि प्रसिद्ध अभियंता पाब्लो बर्लांगा बोएमारे करत आहेत. पेम्बा रोबोने हा संपूर्ण प्रवास पूर्णपणे स्वतःच्या बळावर केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी रस्त्याचा उतार ३० अंशांपेक्षा कमी होता, तिथेच हा रोबो चालू शकला. १६ तासांच्या या कठीण चढाईदरम्यान आलेले अत्यंत दुर्गम आणि खडतर रस्ते रोबोला पार करता आले नाहीत, तिथे त्याच्यासोबत असलेल्या मानवी पथकाने त्याला उचलून मदत केली. तसेच, कडाक्याच्या थंडीमुळे रोबोची बॅटरी आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट खराब होऊ नयेत म्हणून, रोबोच्या कपड्यांच्या आत एक विशेष ‘थर्मल सिस्टीम’ (उष्णता यंत्रणा) बसवण्यात आली होती.