

हांगझोऊ : ह्यूमनॉईड म्हणजेच मानवाकृती (मानवासारखा आकार असलेल्या) रोबोनी जगातील पहिल्या ह्यूमनॉईड रोबो लढाई स्पर्धेत भाग घेऊन सर्वांना थक्क केले. चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार चिनी संघांनी आपले प्रगत लढाऊ रोबो एकमेकांविरुद्ध उभे केले. या रोबोनी एकमेकांना केवळ ठोसे आणि लाथाच मारल्या नाहीत, तर अत्यंत चपळाईने प्रतिस्पर्धकांचे हल्लेही चुकवले.
चायना मीडिया ग्रुपद्वारे आयोजित ‘वर्ल्ड रोबोट टुर्नामेंट- मेका कॉम्बॅट अरेना’ नावाच्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चीनच्या सरकारी CCTV-10 विज्ञान वाहिनीवर देशभरात करण्यात आले. या स्पर्धेत युनिट्री कंपनीच्या G1 ह्यूमनॉईड रोबोनी पहिल्यांदाच आपले लढाई कौशल्य जगासमोर सादर केले. प्रेक्षकांनी या रोबोना ठोसे मारताना, लाथा मारताना आणि प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले चुकवताना पाहिले. या स्पर्धेत काळा, गुलाबी, हिरवा आणि लाल अशा चार संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघाने आपापल्या रोबोला नियंत्रित करण्यासाठी विशिष्ट आणि अनोख्या डावपेचांचा वापर केला.
युनिट्रीच्या G1 ह्यूमनॉईड रोबोटमध्ये अनेक अक्षांवर (axes) अत्यंत अचूकतेने हालचाल करण्याची क्षमता आहे. तो केवळ खांद्याच्या सांध्याचा वापर करून ठोसे मारू शकत नाही, तर प्रतिस्पर्धकांना लाथ मारण्यासाठी आपले गुडघेही प्रभावीपणे वापरू शकतो. ह्यूमनॉईड रोबोसाठी सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे गुंतागुंतीच्या हालचाली करताना स्वतःचा तोल सांभाळणे. मानव लहानपणापासूनच तोल सांभाळायला शिकतो. परंतु, रोबोना यासाठी विशेष अल्गोरिदम आणि सेन्सर्सची गरज भासते. G1 रोबो हे संशोधकांनी या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे.first humanoid robot fight
हे रोबो केवळ न पडता ठोसे मारू शकतात असे नाही, तर लाथा मारताना आणि हल्ले चुकवतानाही आपला तोल प्रभावीपणे सांभाळू शकतात. लढाईच्या वेळी या रोबोवर प्रचंड शारीरिक ताण येतो आणि तो सहन करण्यासाठीच त्यांची रचना करण्यात आली आहे. युनिट्रीने G1 रोबोटला या लढाईत तोल सांभाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) रिइन्फोर्समेंट ट्रेनिंगचा वापर केला. या प्रक्रियेत रोबोला मोठ्या प्रमाणात डेटा देऊन योग्य वर्तणूक शिकवली जाते. यातून तयार झालेला अल्गोरिदम आणि रिअल-टाईम बॅलन्स सेन्सर्स यांच्या एकत्रित वापरामुळे G1 रोबो मानवी नियंत्रणासह किंवा त्याशिवायही आपला तोल सांभाळू शकतो.