Sun’s Magnetic Field | जगाच्‍या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याच्या बाह्य चुंबकीय क्षेत्राचा 'थ्रीडी मॅप'

Sun’s Magnetic Field | जगाच्‍या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याच्या बाह्य चुंबकीय क्षेत्राचा 'थ्रीडी मॅप'
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन / नवी दिल्ली : विज्ञान जगतात एक अत्यंत ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. अमेरिकेतील 'नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक रिसर्च' आणि 'नॅशनल सोलर ऑब्झर्व्हेटरी'च्या वैज्ञानिकांनी सूर्याच्या बाह्य वातावरणातील (कोरोना) चुंबकीय क्षेत्राचा (मॅग्‍नेटिक फिल्‍ड) जगातील पहिला त्रिमितीय (थ्री डायमेन्शनल) नकाशा तयार केला आहे. या शोधामुळे सूर्यावरील महाकाय स्फोट, सौर वादळे आणि त्याचा पृथ्वीवरील तंत्रज्ञानावर होणारा परिणाम अधिक अचूकतेने ओळखणे आता शक्य होणार आहे. हे संशोधन प्रसिद्ध 'द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

शास्त्रज्ञांना गेल्या अनेक दशकांपासून सूर्याच्या बाह्य भागाची (कोरोना) रचना दिसत होती; मात्र त्यातील चुंबकीय क्षेत्राची ताकद आणि थ्रीडी (थ्री डायमेन्शनल) दिशा मोजणे अशक्य बनले होते. वैज्ञानिकांनी कोणत्याही नवीन उपकरणांशिवाय मौना लोआ सोलर ऑब्झर्व्हेटरीमधील (एमएलएसओ) जुन्या उपकरणांचा वापर करून लहरी आणि प्रकाशाच्या संकेतांवरून हा थ्रीडी नकाशा तयार केला. 'अपग्रेटेड कोरोनल मल्टिचॅनेल पोलारिमीटर' आणि ' आयक्‍यूयूडी इन्व्हर्जन' या नवीन गणितीय आणि भौतिक पद्धतीचा मिलाफ करून हे यश संपादन केले गेले.

या संशोधनाचे ४ मुख्य फायदे

अचूक सौर वादळ अंदाज : सूर्यावरून येणाऱ्या धोकादायक लहरी आणि सौर ज्वालांची पूर्वकल्पना मिळणे सोपे होईल.

पृथ्वीवरील ग्रिड व उपग्रहांचे संरक्षण : सौर वादळांमुळे होणारे पॉवर ग्रिड ब्लॅकआऊट, जीपीएस आणि उपग्रह संप्रेषणातील बिघाड टाळता येतील.

अदृश्य शक्ती उलगडली : सूर्याची उघड्या डोळ्यांनी न दिसणारी गुप्त चुंबकीय रचना पहिल्यांदाच मानवाला समजली आहे.

ओपन सोर्स डेटा : इतर संशोधकांसाठी हे सॉफ्टवेअर आणि डेटा मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पृथ्वीसाठी हे संशोधन का महत्त्वाचे आहे?

सूर्याच्या बाह्य वातावरणात होणारे शक्तिशाली चुंबकीय स्फोट पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात प्लाझ्मा आणि किरणोत्सर्ग फेकतात. यामुळे पृथ्वीभोवतीच्या 'स्पेस वेदर'मध्ये मोठा बदल होतो, ज्याचा थेट फटका हवाई वाहतूक, अंतराळवीर, इंटरनेट उपग्रह आणि वीज यंत्रणांना बसतो. या नवीन थ्रीडी नकाशामुळे अशा विनाशकारी सौर वादळांची 'ॲडव्हान्स वॉर्निंग सिस्टीम' विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.