

बीजिंग : भारतातील सर्वात वेगवान ट्रेनचा मान सध्या वंदे भारत एक्स्प्रेसकडे आहे. 180 कि.मी. प्रतितास इतकी कमाल वेग मर्यादा असलेली वंदे भारत ट्रेन प्रत्यक्षात 80 ते 90 कि.मी. प्रतितास वेगाने धावते. भारतात वंदे भारतचे आकर्षण कोणापासून लपलेले नाही; पण आज आपण ज्या ट्रेनबद्दल बोलत आहोत, तिचा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त आहे. इतका वेगवान की, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ती दिसेनाशी होते.
‘जगातील सर्वात वेगवान ट्रेन’चा किताब या ट्रेनच्या नावावर आहे. ही ट्रेन चीनमध्ये आहे. चीनने ‘CR450’ ट्रेनचा यशस्वी ट्रायल रन केला आहे. या ट्रायल रनसह या ट्रेनच्या नावावर जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा किताब नोंदवला गेला आहे. ‘CR450’ ट्रेन जगातील सर्वात हाय-स्पीड ट्रेन आहे. या सर्वात वेगवान हाय-स्पीड ट्रेनने तासी 896 कि.मी. इतका वेग गाठला आहे.
या ट्रेनने जपानच्या L0 सीरिज मॅगलेव्ह (Maglev) ट्रेनचा विक्रम मोडला आहे, ज्याचा वेग 603 कि.मी. प्रतितास होता. अल्ट्रा हायस्पीड रेल प्रवासाच्या शर्यतीत चीनने प्रभुत्व मिळवले आहे. ‘CR450’ चा सध्या ट्रायल रन सुरू आहे. या ट्रायल रनमध्ये या ट्रेनने शांघाय-चेंगडू हाय स्पीड रेल कॉरिडॉरवर वेग पकडला, ज्या मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनला ट्रायल रनदरम्यान 6 लाख कि.मी. चाचणी पूर्ण करावी लागणार आहे.
या ट्रेनने ट्रायल रनमध्ये 896 कि.मी. प्रतितासाचा वेग गाठला असला, तरी व्यावसायिक वेगाने धावण्यासाठी ही ट्रेन ताशी 400 कि.मी. वेगासाठी डिझाईन केली गेली आहे. या ट्रेनला अशाप्रकारे तयार केले गेले आहे की, ती केवळ 4 सेकंदांत 350 कि.मी. प्रतितासाचा वेग गाठू शकते. सध्या या ट्रेनचे ऑपरेशनल मूल्यांकन सुरू आहे. या ट्रेनला विजेच्या वेगाने धावण्यासाठी खास डिझाईन देण्यात आले आहे. ट्रेनला ‘फाल्कन चोच’सारखे (Falcon Beak) एरोडायनामिक डिझाईन देण्यात आले आहे. सध्याच्या ट्रेनपेक्षा 22 टक्के कमी हवा प्रतिरोध (Air Drag) आहे. ट्रेनची बॉडी हलकी आणि पातळ आहे, ज्यामुळे तिला प्रचंड वेग मिळतो.