

बीजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) शर्यतीत चीनने एक क्रांतिकारी शोध लावला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी ‘लाईटजेन’ नावाची एक अनोखी मायक्रोचिप तयार केली आहे, जी विजेऐवजी थेट ‘प्रकाशाच्या लहरींवर’ काम करते. दावा केला जात आहे की, ही चिप काही विशिष्ट कामांमध्ये जगातील दिग्गज एनव्हीडिया कंपनीच्या चिपपेक्षा 100 पटीने अधिक वेगवान आणि वीज वाचवणारी आहे.
शांघाय जियाओ टोंग युनिव्हर्सिटी आणि सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या टीमने ही चिप विकसित केली आहे. यामध्ये 20 लाखांहून अधिक ‘फोटोनिक न्यूरॉन्स’ आहेत. ही चिप इमेज जनरेशन, स्टाईल ट्रान्सफर, फोटो क्लीनिंग आणि 3डी इमेजिंग यांसारख्या कामांसाठी डिझाईन केली आहे. संशोधकांचा दावा आहे की, या कामांमध्ये ही चिप NVIDIA GPU च्या तुलनेत 100 पट वेगवान आहे. याशिवाय, सिंघुआ युनिव्हर्सिटीने ‘ACCEL’ नावाची एक हायब-ीड चिपही तयार केली आहे. ही चिप एका सेकंदात 4.6 पेटाफ्लॉप्स (लाखो-करोडो गणना) करण्याची क्षमता ठेवते. विशेष म्हणजे, ही चिप चीनच्या जुन्या आणि उपलब्ध सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा वापर करूनही बनवता येते. ही चिप ठरावीक गणिती प्रक्रिया इतक्या वेगाने करते की, ते एखाद्या सुपरकॉम्प्युटरप्रमाणे वाटते. मात्र, ही सामान्य संगणक प्रोग्राम किंवा मोठे एआय मॉडेल ट्रेन करण्यासाठी वापरता येणार नाही.
’लाईटजेन’ चिपचे वैशिष्ट्य काय?
सध्या एआयसाठी वापरले जाणारे NVIDIA चे GPU (उदा. A100) हे इलेक्ट्रॉन्स म्हणजेच विजेच्या प्रवाहावर चालतात. ते शक्तिशाली असले, तरी प्रचंड वीज खातात आणि लवकर गरम होतात. मात्र, चीनची ही नवीन चिप खालील कारणांमुळे वेगळी ठरते. यात विजेच्या तारांऐवजी प्रकाशाच्या कणांचा (फोटॉन्स) वापर करून गणिती प्रक्रिया केल्या जातात. जणू काही विजेच्या तारांऐवजी काचेच्या पाईपमधून प्रकाश धावत हिशोब करत आहे. प्रकाशाचा वेग प्रचंड असल्याने ही चिप अतिशय जलद काम करते आणि वीज कमी वापरत असल्याने ती गरम होत नाही. ही चिप ‘मल्टिटास्किंग’ नाही. म्हणजे ती एनव्हीडीयाप्रमाणे सर्व प्रकारची कामे करू शकत नाही, तर काही विशिष्ट कामांसाठीच तयार करण्यात आली आहे.