

दुबई : गोव्याला जायचे असो वा थायलंडला, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एक चांगले आणि आरामदायी हॉटेल शोधणे. जगभरात हॉटेलचा व्यवसाय खूप मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा एक आलिशान हॉटेल्स पाहायला मिळतात, जी व्हीआयपी सेवा देतात. मिळणार्या सुविधांनुसार प्रत्येक हॉटेलचे भाडे वेगवेगळे असते. पण तुम्हाला माहित आहे का, की जगातील सर्वात महागडी हॉटेल रूम कोणती आहे आणि तिचे एका रात्रीचे भाडे किती आहे?
जगातील हे सर्वात महागडे हॉटेल युनायटेड अरब अमिरातीच्या (युएई) दुबई शहरात आहे. ‘अटलांटिस द रॉयल’ नावाच्या या हॉटेलमध्ये जगातील सर्वात महागडी रूम आहे. येथील ‘रॉयल मेन्शन सुइट’ हा या हॉटेलमधील सर्वात महागडा कक्ष मानला जातो. हा रॉयल मेन्शन सुइट तब्बल 2 मजल्यांवर पसरलेला आहे. यात 4 बेडरूम, लिव्हिंग एरिया, किचन, बार, डायनिंग रूम, ऑफिस आणि गेम एरिया अशा आलिशान सुविधा आहेत. या सुइटला 5,124 चौरस फुटांची एक विस्तीर्ण टेरेस आहे, जिथे एक खासगी ‘इन्फिनिटी पूल’ आहे.
या पूलमधून अरबी समुद्र आणि प्रसिद्ध ‘पाम आयलंड’चा विहंगम नजरा पाहायला मिळतो. मीडिया रिपोर्टस्नुसार, या रॉयल मेन्शन सुइटचे एका रात्रीचे भाडे तब्बल 1 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 95 लाख रुपये आहे. इतक्या पैशांमध्ये एखादी व्यक्ती अनेक देशांची सफर करू शकते किंवा किमान दहा वेळा मालदीवला जाऊन फिरून येऊ शकते. या सुइटचे भाडे इतके महाग असण्यामागे येथील ‘लग्झरी सर्व्हिस’ कारणीबद्ध आहे. या सुइटमध्ये राहणार्या पाहुण्यांना खालील विशेष सुविधा मिळतात. व्हीआयपी प्रायव्हेट एन्ट्रन्स : पाहुण्यांसाठी स्वतंत्र आणि गुप्त प्रवेशद्वार असते. पर्सनल बटलर : 24 तास पाहुण्यांच्या सेवेसाठी वैयक्तिक नोकर (बटलर) तैनात असतो. ब्रँडेड एमिनिटीज : रूममध्ये जगप्रसिद्ध ‘चोपर्ड’ ब्रँडच्या विशेष चैनीच्या वस्तू आणि सुविधा पुरवल्या जातात. या ‘अटलांटिस द रॉयल’ हॉटेलचे व्यवस्थापन ‘कर्सनर इंटरनॅशनल’ आणि ‘ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट’ या कंपन्यांकडे आहे.