

नैरोबी : मध्य आफ्रिकेत पसरलेल्या इबोलाच्या नव्या उद्रेकामुळे मे महिन्यात आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत काँगो आणि युगांडामध्ये ९०० हून अधिक संशयित रुग्ण आणि २०० मृत्यूंची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ३ नवीन इबोला लसींच्या निर्मितीला युद्धपातळीवर वेग देण्यात आला आहे.
या उद्रेकाचा सर्वाधिक फटका काँगोला बसला असून, १९७६ मध्ये इबोला नदीकाठी या विषाणूचा शोध लागल्यापासून देशातील हा १७ वा उद्रेक आहे. यापूर्वीचे बहुतांश उद्रेक हे झैरे या अत्यंत प्राणघातक विषाणूमुळे झाले होते, ज्यावर आता मान्यताप्राप्त उपचार आणि लसी उपलब्ध आहेत. मात्र, चालू उद्रेक हा बुंदिबुग्यो या नवीन विषाणू प्रजातीमुळे होत आहे. हा विषाणू ‘झैरे’ पेक्षा कमी प्राणघातक असला, तरी यावर अजून कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. ‘मॉर्बिडिटी अँड मॉर्टलिटी वीकली रिपोर्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मॉडेलिंगनुसार, जर प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढील तीन महिन्यांत रुग्णांची संख्या २०,००० पेक्षा जास्त होऊ शकते. हा इतिहासामधील सर्वात मोठ्या इबोला उद्रेकांपैकी एक असू शकतो. स्थानिक संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय मदत व आरोग्य पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत.
इबोलाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) लसीकरण करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. ‘कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेर्डनेस इनोव्हेशन्स’ (CEPI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड हॅचेट यांनी सांगितले की, ‘‘सुरक्षित आणि प्रभावी ‘बुंदिबुग्यो’ लस लवकरात लवकर विकसित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’’
लसीकरणाचे दोन मार्ग : १. रिंग व्हॅक्सिनेशन : बाधित रुग्णाच्या थेट संपर्कातील आणि संभाव्य संपर्कातील व्यक्तींना लस देणे. २. सामूहिक लसीकरण : जर उद्रेक एखाद्या विशिष्ट भागातच मर्यादित असेल, तर त्या संपूर्ण गाव किंवा परिसरातील लोकांचे लसीकरण करणे. २०१४-२०१६ दरम्यान झालेल्या ‘झैरे’ विषाणूच्या भीषण उद्रेकानंतर वैज्ञानिकांनी या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे अनेक मार्ग शिकले आहेत. जलद निदान, रुग्णांचा शोध घेणे, विलगीकरण, संसर्ग प्रतिबंध, सुरक्षित दफनविधी आणि त्वरित वैद्यकीय उपचार हे संसर्ग रोखण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, नव्या विषाणूवर लस कधीपर्यंत तयार होणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.