

भोपाळ : रस्ते अपघातात किंवा आपत्कालीन परिस्थितीत गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा जीव गमवावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून मध्य प्रदेशात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) भोपाळ आणि आयआयटी इंदूर मिळून जगातील पहिली पोर्टेबल थ्रीडी एक्स-रे सिस्टीम विकसित करत आहेत. या प्रणालीमुळे आता रुग्णालयात जाण्यापूर्वीच घटनास्थळी जखमींच्या दुखापतीचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली असून, त्यासाठी 8 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, यावर्षी देशभरातून आलेल्या 1224 संशोधन प्रस्तावांपैकी केवळ 38 प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, मध्य प्रदेशातून निवडलेला हा एकमेव प्रकल्प आहे. ही जगातील पहिली एआय आधारित पोर्टेबल थ्रीडी एक्स-रे युनिट असेल. याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. सीटी स्कॅनसारखी प्रतिमा : हे युनिट सीटी स्कॅनप्रमाणे थ्रीडी इमेजेस देईल; परंतु त्यातील रेडिएशनचे प्रमाण अत्यंत कमी असेल.
सीटी स्कॅनच्या तुलनेत रेडिएशन एक्सपोजर सुमारे 500 पटीने कमी असेल, ज्यामुळे रुग्णाला हानी पोहोचणार नाही. ही सिस्टीम विविध कोनातून एक्स-रे प्रतिमा घेईल आणि ‘एआय अल्गोरिदम’द्वारे त्याचे रूपांतर 3डी फॉरमॅटमध्ये करेल. हे निकाल मोबाईल किंवा स्क्रीनवर त्वरित पाहता येतील. एम्स भोपाळचे डॉक्टर बी. एल. सोनी आणि डॉक्टर अंशुल राय या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. डॉ. अंशुल राय यांनी सांगितले की, ही मशिन पूर्णपणे पोर्टेबल असेल. ती रुग्णवाहिकेत किंवा दुर्गम भागात सहज नेली जाऊ शकते. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांच्या दुखापतीचे गांभीर्य समजेल आणि ‘गोल्डन आवर’ (अपघातानंतरचा पहिला महत्त्वाचा तास) मध्ये योग्य उपचार सुरू झाल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढेल.