

लंडन : दातांच्या आरोग्यासाठी आता एक नवा आणि आश्चर्यकारक उपाय समोर आला आहे. मेंढीची लोकर आणि इतर केसांपासून मिळणार्या ‘केराटिन’ या प्रथिनाचा वापर करून दातांचे किडणे थांबवता येऊ शकते आणि दातांवरील संरक्षक थर (अॅनॅमल) दुरुस्त करता येऊ शकतो, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी लोकरीतून केराटिन वेगळे करून ते दातांवर लावले असता, दातांवर नैसर्गिक एनॅमलप्रमाणेच एक स्फटिकासारखे संरक्षक आवरण तयार झाल्याचे दिसून आले.
हे संशोधन यशस्वी झाल्यास, दातांच्या किडण्यावरील उपचारांसाठी एक स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. येत्या दोन ते तीन वर्षांत हा उपचार सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अॅडव्हान्स्ड हेल्थकेअर मटेरियल्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. किंग्स कॉलेज लंडन येथील संशोधकांनी दातांच्या अॅनॅमलच्या दुरुस्तीसाठी केराटिनच्या वापराची चाचणी केली. दातांचे अॅनॅमल हे हाडे किंवा केसांप्रमाणे नैसर्गिकरित्या पुन्हा तयार होत नाही. एकदा ते नष्ट झाले की कायमचे निघून जाते, असे या अभ्यासाचे सह-लेखक आणि प्रोस्थोडोन्टिक्समधील संशोधक डॉ. शेरीफ एलशारकावी यांनी सांगितले.
‘केराटिन’ हे दातांवरील सध्याच्या उपचारांना एक परिवर्तनात्मक पर्याय ठरू शकते,’ असे या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि किंग्स कॉलेज लंडनच्या दंतचिकित्सा संशोधक सारा गामिया यांनी सांगितले. त्यांचे म्हणणे आहे की, या उपचाराचे अनेक फायदे आहेत : नैसर्गिक आणि टिकाऊ : हे केस आणि त्वचेसारख्या जैविक कचर्यातून मिळवले जाते, त्यामुळे ते पूर्णपणे नैसर्गिक आहे.
सुरक्षित : दातांच्या उपचारात वापरल्या जाणार्या पारंपरिक प्लास्टिक रेझिनची गरज यामुळे संपेल. हे रेझिन विषारी आणि कमी टिकाऊ असतात.
नैसर्गिक दिसणारे : केराटिन दातांच्या मूळ रंगाशी अधिक जुळते, ज्यामुळे उपचारानंतर दात नैसर्गिक दिसतात. स्वस्त आणि सहज उपलब्ध: हा उपचार कमी खर्चिक असण्याची शक्यता आहे.
दात किडणे ही जगातील सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहे. जगभरात सुमारे 200 कोटी लोकांना हा त्रास होतो. आंबट पदार्थ, तोंडाची अस्वच्छता आणि दैनंदिन वापरामुळे दातांवरील अॅनॅमलचा थर हळूहळू झिजतो. हा थर नाहीसा झाल्यास दात दुखणे, कॅव्हिटी (दात किडणे) आणि दात पडण्यासारख्या समस्या निर्माण होतात. एकंदरीत, हे संशोधन दंत उपचारांच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवण्याची क्षमता ठेवते. टाकाऊ समजल्या जाणार्या वस्तूंमधून दातांसाठी एक टिकाऊ आणि प्रभावी उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे, जे भविष्यात कोट्यवधी लोकांसाठी वरदान ठरू शकते.
प्रथम मेंढीच्या लोकरीच्या धाग्यांमधून केराटिन हे प्रथिन वेगळे करण्यात आले. हे केराटिनपाण्यात मिसळून त्याचा एक पातळ थर (फिल्म) तयार केला. हा थर दातांच्या नमुन्यावर लावण्यात आला. जेव्हा हा थर लाळेतील खनिजांच्या (कॅल्शियम आणि फॉस्फेट) संपर्कात आला, तेव्हा त्याने नैसर्गिक अॅनॅमलप्रमाणेच एक मजबूत आणि स्फटिकासारखे आवरण तयार केले. एका महिन्याच्या कालावधीत या आवरणाने दातांवर कॅल्शियम आणि फॉस्फेटचे कण आकर्षित करून एक कठीण संरक्षक थर तयार केल्याचे दिसून आले.