

वॉशिंग्टन : स्पेस एक्स्प्लोरेशनच्या जगात एक खूप अद्भत आणि नवा प्रयोग करण्यात आला आहे. प्रथमच पृथ्वीच्या कक्षेत एक लाकडी उपग्रह पाठवण्यात आला आहे, हे सर्वश्रुत आहे. हा लाकडी उपग्रह जपानचा असून, त्याचं नाव लिंगोसॅट असे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवरून पाच क्यूबसॅट पाठवण्यात आले होते. त्यात लिंगोसॅटचाही समावेश होता.
हा उपग्रह जपानची क्योटो युनिव्हर्सिटी आणि सुमिटोमो फॉरेस्ट्री या घर बनवणार्या कंपनीने मिळून बनवला आहे. हा उपग्रह केवळ 10 सेंटिमीटरचा असून, तो मॅग्नोलिया लाकडाच्या पॅनेलपासून बनवण्यात आला आहे. त्यात नटबोल्ट नाही, स्क्रू नाही आणि त्यात कोणत्याही प्रकारचा गोंदही वापरण्यात आलेला नाही. त्याचे सुटे भाग जोडण्यासाठी जपानमधल्या विशेष अशा वूड जॉयनरी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या उपग्रहाचे वजन फक्त 900 ग्रॅम असून, तो पृथ्वीच्या कक्षेत सहा महिने राहणार आहे. पारंपरिक उपग्रहाला हा उपग्रह पर्याय ठरू शकतो का, हे या उपग्रहाच्या प्रयोगावरून कळणार आहे. पारंपरिक उपग्रहात अॅल्युमिनियम, टायटॅनियम, टेफ्लॉन आणि थर्मोप्लास्टिक्स अशा घटकांचा वापर केला जातो.
लिंगोसॅट या लाकडी उपग्रहावर अनेक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हा उपग्रह दर 45 मिनिटांनी अंधारातून प्रकाशात येणार आहे. हा उपग्रह उपकरणांचे संरक्षण कसे करतो, ही क्षमताही तपासली जाईल. मानवाच्या अंतराळातल्या कृती या विषयाचा जपानमधल्या क्योटो विद्यापीठात अभ्यास करणारे आणि स्पेस शटलमधून अंतराळात जाऊन आलेले अंतराळवीर ताकाओ दोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील सर्वांत मजबूत अशा मॅग्नोलिया झाडाच्या लाकडापासून हा उपग्रह तयार करण्यात आला आहे.
शास्त्रज्ञ असे म्हणतात, की पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यास लाकडी उपग्रहामुळे हातभार लागणार आहे. तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करील, तेव्हा तो जळून जाईल; मात्र त्याचे जळणे हानिकारक असणार नाही. कारण जळणारे फक्त लाकूडच असेल. जपानी चेरीसह अन्य अनेक प्रकारच्या झाडांचे परीक्षण यासाठी करण्यात आले; मात्र मॅग्नोलियाच्या झाडांचे लाकूडच या कामी सर्वांत मजबूत असल्याचे प्रयोगातून दिसून आले. पारंपरिक उपग्रह जळतात, तेव्हा त्यांच्या ज्वलनामुळे वातावरणात अॅल्युमिनियम ऑक्साईडचे कण तयार होतात आणि ते वातावरणाच्या वरच्या भागात बरीच वर्षे राहतात.