

वॉशिंग्टन : मृत्यूनंतर खरंच काही आयुष्य असतं का? कोणी व्यक्ती मेल्यानंतर परत येऊन त्या जगाबद्दल सांगू शकते का? हे प्रश्न गेली अनेक वर्षे सामान्य माणसांच्या मनात घर करून आहेत; पण अमेरिकेतील पाम रेनॉल्डस् नावाच्या गायिकेसोबत घडलेल्या एका घटनेने या चर्चेला धक्कादायक वळण दिले. एका अत्यंत गुंतागुंतीच्या ब्रेन सर्जरीदरम्यान पाम सुमारे 1 तास वैद्यकीयद़ृष्ट्या मृत होती, पण जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिने जो अनुभव सांगितला, तो ऐकून मोठमोठे डॉक्टरही चक्रावून गेले. तिने दावा केला की, तिने ‘स्वर्ग’ पाहिला, जिथे तिचे मृत नातेवाईक होते आणि एक रहस्यमयी प्रकाश होता.
1991 मध्ये पाम रेनॉल्डस्च्या मेंदूत एक ‘एन्युरिझम’ (धमनीला आलेली सूज) होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी ‘हायपोथर्मिक कार्डियाक अरेस्ट’ नावाच्या प्रक्रियेचा वापर केला. यामध्ये तिच्या शरीराचे तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणण्यात आले. शरीरातील रक्त बाहेर काढण्यात आले. तिचे हृदय काही काळासाठी बंद करण्यात आले. या स्थितीत पाम वैद्यकीयद़ृष्ट्या पूर्णपणे मृत होती. तिच्या मेंदूत किंवा शरीरात कोणतीही हालचाल नोंदवली जात नव्हती. पण शस्त्रक्रियेनंतर जेव्हा तिला पुन्हा जिवंत करण्यात आले, तेव्हा तिने सांगितलेल्या गोष्टी अविश्वसनीय होत्या.
पामच्या म्हणण्यानुसार, शरीरातून बाहेर पडल्यावर तिला एक अत्यंत तेजस्वी प्रकाश दिसला, त्या प्रकाशाच्या दिशेने जाताना तिला तिचे ते नातेवाईक दिसले, जे यापूर्वीच मरण पावले होते. ते तिला बोलवत होते, पण त्याचवेळी एका रहस्यमयी शक्तीने तिला परत जाण्यास सांगितले. तो अनुभव संपूच नये असे मला वाटत होते, पण मी पुन्हा माझ्या शरीरात परत आले.