Skydiving Accident : तब्बल १२,००० फूट उंचीवरून पडूनही जिवंत!

ब्रिटनमध्ये स्कायडायव्हिंगचा थरार अंगावर काटा आणणारा
Skydiving Accident
तब्बल १२,००० फूट उंचीवरून पडूनही जिवंत!
Published on
Updated on

लंडन : स्कायडायव्हिंगचा थरार काही क्षणातच किती प्राणघातक ठरू शकतो, याची प्रचिती ब्रिटनमधील होली विफन हिच्यासोबत घडलेल्या एका अपघातातून येते. हजारो फूट उंचीवर विमानातून उडी मारून ती इतर स्कायडायव्हर्ससोबत खाली येत होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते; परंतु अचानक झालेल्या एका धडकेने या खेळाला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले.

‘डेली स्‍टार’च्या वृत्तानुसार, होली नॉटिंघमजवळील लँगर एअरफिल्ड येथे स्कायडायव्हिंग करत होती. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात एका दुसऱ्या स्कायडायव्हरचा पाय थेट होलीच्या डोक्याला लागला. धडक इतकी जोरदार होती की, होली हवेतच बेशुद्ध झाली. या स्थितीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पॅराशूट उघडणे होते; परंतु बेशुद्ध असल्यामुळे तिला ते शक्य झाले नाही. होलीला अशा स्थितीत खाली पडताना पाहून एका सह-स्कायडायव्हरने हवेत तिचा पाठलाग करून तिला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेगाने खाली पडणाऱ्या व्यक्तीला पकडणे अशक्य ठरले आणि सुमारे ३ हजार फुटांवर आल्यावर त्या साथीदाराला स्वतःचे पॅराशूट उघडावे लागले.

होली सुमारे १०,००० फूट अंतरापर्यंत पॅराशूट न उघडताच खाली कोसळत राहिली. अपघातादरम्यान ती बेशुद्ध असल्याने तिला या प्रवासाची कोणतीही स्पष्ट आठवण नाही. एखादे स्वप्न पडल्यासारखे तिला वाटत होते. जेव्हा तिने थेट जमिनीवर डोळे उघडले, तेव्हाच तिला आपण जिवंत असल्याचे भान आले. इतक्या प्रचंड उंचीवरून पडल्यानंतर होलीचे वाचणे हा एक मोठा चमत्कार मानला जात आहे. होली निश्चित केलेल्या लँडिंग स्पॉटवर न पोहोचता एका झाडावर जाऊन आदळली. या झाडामुळे तिची खाली पडण्याची गती बऱ्याच अंशी मंदावली. जर ती थेट जमिनीवर आदळली असती तर तिचा जागीच मृत्यू झाला असता. या अपघातात होलीचा डावा पाय मोडला असून तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे. याशिवाय, शरीरावर अनेक गंभीर दुखापती आणि वळ उठले आहेत.

अपघाताची काही दृश्ये तिच्या हेल्मेटवरील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहेत. हवेत धडक बसल्यापासून ते थेट जमिनीवर शुद्ध येण्यापर्यंतचा मधला काळ तिच्या आठवणीतून पूर्णपणे पुसला गेला आहे. जमिनीवर पोहोचताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, १० हजार फूट उंचीवरून विनापॅराशूट पडूनही जिवंत राहणे हा एका चमत्कारापेक्षा कमी नाही. झाडामुळे तिला नवीन आयुष्य मिळाले असून सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news