

रिओ डी जानेरिओः रात्रीची वेळ आणि चोहोबाजूला पसरलेला मिट्ट काळोख... अशा वेळी एक महिला आपल्या खोलीबाहेर पडली. तिचे ध्येय कोणते रोमांचक जंगल सफारी करणे हे नव्हते, तर फक्त मोबाईलला चांगले ‘वाय-फाय’ सिग्नल मिळावे एवढेच होते. परंतु, काही वेळातच तिच्यासमोर असा एक प्राणी येऊन उभा राहिला, ज्याला पाहून कुणाचीही धडकी भरेल! लांबच लांब पाय, बारीक शरीर, लालसर-तपकिरी रंग आणि अंधारात चमकणारे डोळे. कॅमेऱ्यासमोर हळूहळू पुढे जाणाऱ्या या जीवाला पाहून पहिल्या नजरेत ओळखणे अजिबात सोपे नव्हते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही हाच प्रश्न फिरू लागला की, शेवटी हा प्राणी आहे तरी कोणता?
हा व्हिडीओ ब्राझीलच्या पँटानाल भागातील असून, Flavia Tasso यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अंधारात कॅमेऱ्याचा प्रकाश पडताच त्या प्राण्याचे डोळे चमकू लागले आणि त्याचे अत्यंत लांब पाय पाहून लोकांनी वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली. कोणी त्याला लांडगा म्हटले, तर कोणी दुसराच शिकारी प्राणी. परंतु, याचे खरे नाव समोर आल्यानंतर सर्वच चक्रावून गेले. व्हिडीओमध्ये दिसणारा हा जीव ‘मॅनड वूल्फ’ आहे. याचे नाव ऐकून हा लांडग्याचीच एखादी प्रजाती असावी, असे वाटू शकते; पण तसे नाही. याचे शास्त्रीय नाव Chrysocyon brachyurus असे असून, हा दक्षिण अमेरिकेत आढळतो.
या प्राण्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याचे लांबच लांब पाय. शरीराच्या तुलनेत पाय इतके लांब असतात की, दूरवरून पाहिल्यास हा भलताच प्राणी असल्याचा भास होतो. लाल-तपकिरी रंगाच्या शरीरासोबतच त्याच्या मानेच्या मागे काळ्या आणि लांब केसांची पट्टी असते. मानेभोवती असलेल्या या आयाळीसारख्या लांब केसांमुळेच त्याला ‘मॅनड’ (Maned) हे नाव देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी त्याच्या शरीरावर प्रकाश पडल्यास चमकणारे डोळे आणि लांब पायांमुळे तो अधिकच रहस्यमय दिसतो. हा प्राणी दिसायला मोठा शिकारी वाटत असला, तरी त्याची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे. हा सामान्य लांडग्यांप्रमाणे कळपात (झुंड) राहत नाही, तर एकटा राहणे पसंत करतो.
उंच गवताळ प्रदेशात फिरताना या लांब पायांमुळे त्याला लांबपर्यंत स्पष्ट पाहता येते आणि आसपासच्या हालचाली समजण्यास मदत होते. हा प्राणी ब्राझीलच्या ‘सेराडो’ आणि पँटानालसारख्या मोठ्या दलदलीच्या भागात जास्त आढळतो. मॅनड वूल्फचा आहारही इतर हिंस्त्र प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. हा केवळ मांसावर अवलंबून नसतो. याच्या खाद्यामध्ये लहान प्राणी, वनस्पती आणि विशेषतः ‘वूल्फ अॅपल’ नावाचे फळ समाविष्ट असते. काही लोक या विचित्र जीवाला पाहून घाबरले असले, तर काहींना सहसा न दिसणाऱ्या या दुर्मीळ जीवाला अगदी जवळून पाहता आल्याचा आनंद झाला आहे.