Loudest Shout World Record | सर्वात जोरात ओरडण्याचा महिलेचा विक्रम!

Loudest Shout World Record |
Loudest Shout World Record | सर्वात जोरात ओरडण्याचा महिलेचा विक्रम!
Published on: 
Updated on: 

लंडन : अनेकदा लोक रागात किंवा आनंदाने जोरात ओरडतात; पण कधी तुम्ही विचार केला आहे का की, एखादी व्यक्ती किती जोरात ओरडू शकते? नुकतीच इंग्लंडमधील एका महिलेने आपल्या आवाजाच्या बळावर एक अनोखा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडच्या ब्रेन्डा विलिसन या महिलेने तब्बल १०५.९ डेसिबल इतका प्रचंड आवाज काढून जगातील सर्वात जोरात ओरडणारी महिला होण्याचा मान पटकावला आहे.

सामान्य माणसाची बोलण्याची पातळी ६० डेसिबलच्या आसपास असते, तर १०५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा एखाद्या हॉर्नचा आवाज, रॉक कॉन्सर्ट किंवा विमान उड्डाण करताना होणाऱ्या आवाजाएवढा तीव्र असू शकतो. ब्रेन्डा विलिसन यांनी इतक्या उच्च तीव्रतेचा आवाज काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्यांच्या या विक्रमाची सोशल मीडियावर आणि जगभरात जोरदार चर्चा रंगली असून, त्यांच्या या अफाट आवाजाने सर्वांनाच चकित केले आहे. तिचा आवाज दीड मैलापर्यंत जाऊ शकतो.

ब्रेंडा गेल्या चाळीस वर्षांपासून 'टाऊन क्रायर'चे काम करीत आहे. हे काम आपल्याकडील दवंडी पिटवणाऱ्या व्यक्तीसारखे असते. शहरातील लोकांना महत्त्वाच्या घोषणा ओरडून सांगण्याचे हे काम आहे. त्या हे काम १९८७ पासून करीत आहेत. आता २०१३ पासून त्या इंग्लंडच्या न्यूमार्केटमध्ये हे काम करीत आहेत. इंग्लंडमध्ये सुमारे दहा टक्के टाऊन क्रायर महिला आहेत. ब्रेंडा यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांचा आवाजाचा विक्रम झाला, त्यावेळी खरे तर त्यांना सर्दी झाल्याने आपल्या पूर्ण क्षमतेने ओरडू शकल्या नव्हत्या! घशाचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्या मध-लिंबूचा वापर करतात. मोठ्या आवाजासाठी सरावही गरजेचा असल्याचे त्या सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.