Real Snakes and Ladders | महिलेने घरात खेळली खरीखुरी ‘साप-शिडी’!

Real Snakes and Ladders |
Real Snakes and Ladders | महिलेने घरात खेळली खरीखुरी ‘साप-शिडी’!
Published on
Updated on

नवी दिल्ली : लहानपणी आपण सर्वांनीच पुठ्ठ्यावरचा किंवा मोबाईलमधला ‘साप-शिडी’ हा खेळ खेळला असेल. पण, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की जर हा खेळ प्रत्यक्षात जिवंत सापांसोबत खेळावा लागला तर? कल्पनेनेच अंगावर काटा आला ना? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकर्‍यांची झोप उडाली आहे. एका बंद खोलीत जमिनीवर मोठी शिडी आणि अनेक जिवंत साप सोडून एक महिला ‘रिअल स्नेक अँड लॅडर’ खेळताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण ‘डाईस’ (फासा) फेकतो. फाशावर जो अंक येतो, तेवढी पावले महिलेला पुढे जायचे असते. मात्र, ही महिला ल्युडोच्या गोटीसारखी जशी पुढे पाऊल टाकते, तसे तिथे असलेले साप इकडे-तिकडे उड्या मारू लागतात आणि काही साप तर तिच्या अंगावर धावून येतात. खेळाचे नियम मोबाईलमधील गेमसारखेच आहेत, फक्त फरक इतकाच की इथे साप आणि शिडी दोन्हीही ‘ओरिजनल’ आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारे साप बिनविषारी असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत असला, तरी सापांचे उड्या मारणे पाहून कोणाचाही थरकाप उडेल असेच हे द़ृश्य आहे.

हा व्हिडीओ राहिला रशीद (@_shilpi_rahila) नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, दोन दिवसांत याला 42 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकर्‍यांनी मजेशीर आणि भीतिदायक कमेंटस्चा पाऊस पाडला आहे : एका युजरने म्हटले, ‘हा डुप्लिकेट नाही, तर खरा ओरिजनल गेम आहे! ‘दुसर्‍या एका महिला युजरने कमेंट केली, ‘बहीण, खेळ तू खेळतेयस पण इथे माझे पाय थरथरत आहेत.‘तिसर्‍याने लिहिले, ‘व्हिडीओ असा बनवा की कोणीही कॉपी करण्याची हिंमत करणार नाही!’ व्हिडीओमध्ये महिला सुरक्षितपणे आपल्या जागी पोहोचते आणि तिथले लोक हसताना दिसतात. मात्र, इंटरनेटवर अनेक युजर्सनी याला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे धाडस जीवावर बेतू शकते, असा इशाराही काही सजग नागरिकांनी दिला आहे. शिवाय वन्यजीवांचा असा वापर करणेही चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news