

बीजिंग : सुंदर दिसण्याच्या इच्छेपोटी लोक अनेकदा कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेतात. अनेकदा याचे परिणाम खूप चांगले होतात. परंतु, काही प्रकरणांमध्ये एक लहानशी चूकही आयुष्यभराचे दुःख बनू शकते. चीनमधून समोर आलेली अशीच एक घटना सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे, जिथे एका महिलेची ‘ब्युटी सर्जरी’ तिच्यासाठीच शाप ठरली आहे.
रिपोर्टस्नुसार, पूर्व चीनमध्ये राहणाऱ्या ‘वांग’ नावाच्या महिलेने २०२० मध्ये ‘डबल आयलिड सर्जरी’ केली होती. ही शस्त्रक्रिया डोळ्यांच्या पापण्या अधिक आकर्षक आणि मोठ्या दाखवण्यासाठी केली जाते. यासाठी तिने जियांग्सू प्रांतातील सुझोऊ शहरातील एका कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये सुमारे १२ हजार युआन (भारतीय चलनानुसार सुमारे १.४ लाख रुपये) खर्च केले होते. परंतु, या शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावत गेली. आता परिस्थिती अशी आहे की, गेल्या ६ वर्षांपासून ती तिचे डोळे पूर्णपणे बंद करून झोपू शकलेली नाही. यासोबतच तिच्या डोळ्यांतून सतत पाणीदेखील वाहत असते.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्या डोळ्यांत तीव वेदना सुरू झाल्या. पापण्यांचा आकार विद्रूप दिसू लागला आणि डोळ्यांभोवती प्रचंड सूज आली. त्रास वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. ज्या महिलेने तिची सर्जरी केली होती, तिने सुरुवातीला ‘काही दिवसांत सर्व ठीक होईल’ असे आश्वासन दिले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. नंतर तर त्या महिलेने वांगचे फोन उचलणेही बंद केले. वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना आढळले की, ऑपरेशनदरम्यान डोळ्यांमधील महत्त्वाच्या ग्रंथी आणि पापण्यांना मोठी ईजा झाली होती. डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी वांगला पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु, तरीही तिचे डोळे पूर्ववत होऊ शकले नाहीत. आज ती सामान्य माणसासारखे डोळे मिटून झोपू शकत नाही, तर तिला अर्धवट उघड्या डोळ्यांनीच झोपावे लागते.