

जयपूर : जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दिसण्याच्या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. बिबट्या, वाघ, सिंह हे प्राणी अनेकदा गावांमध्ये किंवा शहरी भागात शिरतात. अशा प्राण्यांशी सामना करणे वाटते तितके सोपे नसते. मात्र, अशाच एका घटनेत एका महिलेने दाखवलेले धाडस सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे एका घरात अचानक बिबट्या घुसला. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. घरातील सदस्यांनी घाबरून पळ काढला. परंतु, याच घरात राहणार्या एका महिलेने धाडस दाखवत बिबट्याला चक्क दोरीने बांधून ठेवले, त्याच्यावर चादर फेकली आणि वन विभागाला माहिती दिली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही घटना उदयपूरमधील आहे, जिथे बिबट्याने एका घरात शिरकाव केला. बिबट्याला पाहून बहुतेक लोक घाबरून पळाले. पण, त्या घरातील महिलेने घाबरण्याऐवजी धैर्याने आणि प्रसंगावधान राखून हातात दोरी घेतली आणि संधी साधून बिबट्याच्या पायाला बांधून ठेवले. यानंतर तिने तत्काळ वन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले.
या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून अनेकांनी या महिलेला ‘वाघीण‘ असे संबोधले आहे. जंगलातील प्राण्यांचा सामना करताना केवळ भीती नाही, तर प्रसंगावधान आणि शौर्यही आवश्यक आहे, हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या या कृतीमुळे मोठा अनर्थ टळला आणि परिसरात भीतीचे वातावरण असतानाही ती शांत आणि संयमी राहिली. तिचे हे धाडस समाजासाठी एक प्रेरणा देणारे ठरत आहे.