

लंडन : माणसाचा सर्वात जवळचा, विश्वासू साथीदार म्हणजे कुत्रा. राखण करण्यापासून ते साथसोबत करण्यापर्यंत अनेक बाबतीत मानवाचा मित्र बनलेला कुत्रा हा लांडग्यांपासूनच परिवर्तन होऊन विकसित झालेला आहे; मात्र जंगली लांडग्यांना मानवाने स्वतःच पाळीव बनवले की अन्य काही कारणे होती याबाबत आता नवे संशोधन झाले आहे. या नव्या अभ्यासानुसार हे शक्य आहे की लांडग्यांनी स्वतःच मानवी सहवास निवडला असेल, कारण त्यामुळे त्यांना अन्नाचा सातत्याने पुरवठा मिळू शकला. त्यानंतर, या सहज मिळणार्या आहारावर अवलंबून राहणार्या लांडग्यांनी अशाच स्वभावाच्या जोडीदारांची निवड केली असण्याची शक्यता आहे.
ही संकल्पना नवीन नसली तरी, नव्या संशोधनातून हे सिद्ध होते की नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे लांडग्यांनी स्वतःला कुत्र्यांमध्ये परिवर्तित केले असण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व आणि अनुवंशिक पुरावे दर्शवतात की कुत्रे हे राखीव लांडग्यांपासून विकसित झाले असून, त्यांचे दोन टप्प्यांत पाळीव प्राणी म्हणून परिवर्तन झाले. सुमारे 30,000 ते 15,000 वर्षांपूर्वी जंगलातील लांडग्यांचे प्राचीन कुत्र्यांमध्ये रूपांतर झाले, तर त्यानंतरच्या 15,000 वर्षांपासून आतापर्यंत कुत्र्यांच्या विविध प्रजाती उदयास आल्या. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, हे दोन टप्पे वेगवेगळ्या उत्क्रांती प्रक्रियांमुळे घडून आले. दुसर्या टप्प्यात मानवांनी शिकार आणि सहवासासाठी अधिक मवाळ स्वभावाचे कुत्रे निवडले आणि त्यांचे संगोपन करून आजच्या पाळीव कुत्र्यांच्या विकास केला. परंतु पहिल्या टप्प्यात कुत्र्यांच्या प्रजनन प्रक्रियेस कोणत्या घटकांनी चालना दिली याबाबत निश्चित माहिती नव्हती.
एका संकल्पनेनुसार, लांडग्यांनी ‘स्वयं-गृहपालन’ (पाळीव प्राणी होण्याची प्रक्रिया) अनुभवली. प्रागैतिहासिक काळात काही लांडगे मानवी वसाहतींमध्ये जाऊन अन्न शोधू लागले. या नियमित अन्नपुरवठ्यामुळे त्यांनी माणसांच्या जवळ राहणे पसंत केले. हे अधिक सहिष्णु लांडगे जंगलातील अनिश्चित अन्नपुरवठ्यापेक्षा मानवांच्या सहवासातील अन्नावर अवलंबून राहू लागले आणि त्यांच्याच वंशजांमधून पहिले पाळीव कुत्रे निर्माण झाले. याचसारखी प्रक्रिया मांजरांच्या घरगुतीकरणातही झाली असण्याची शक्यता संशोधक मांडतात. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी शेती करणार्या समुदायांजवळ राहणार्या वन्य मांजरींनी उंदीर शिकार करून अन्न मिळवण्याच्या बदल्यात मानवांकडून संरक्षण मिळवले आणि अशा परस्पर फायदेशीर नात्यातून घरगुती मांजरींचा जन्म झाला.