न्यूयॉर्क : अब्जाधीश व्यावसायिक अॅलन मस्क यांची 'न्यूरालिंक' ही 'न्यूरोसायन्स' स्टार्टअप कंपनी गेल्या काही वर्षांपासून मानवी मेंदू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने नुकतेच असे एक डुक्कर दाखविले, की त्याच्या मेंदूत गेल्या दोन महिन्यांपासून नाण्याच्या आकाराची 'कॉम्प्युटर चिप' बसवण्यात आली आहे. मानवी शरीरात होणार्या आजारांवरील उपचारांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, तसेच मेंदूशी संबंधित आजारांवरील उपचारासंबंधीची ही चाचणी आहे. टेस्ला इंडस्ट्री आणि स्पेस एक्सचे सीईओ अॅलन मस्क यांनी 2016 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे 'न्यूरालिंक' नामक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचा मूळ उद्देश म्हणजे माणसाच्या मेंदूत एक खासप्रकारचे 'वायरलेस काम्प्युटर' बसवण्याचे आहे. हा कॉम्प्युटर माणसाला अल्झायमर, डिमेंशिया आणि पाठीच्या कण्यासंबंधीच्या आजारांशी लढण्यास व हे आजार बरे करण्यासही मदत करेल.
कंपनीचे प्रमुख सर्जन डॉ. मॅथ्यू मॅकडॉगल यांनी सांगितले, की न्यूरालिंकची पहिली क्लिनिकल ट्रायल लवकरच पक्षाघाताने त्रस्त आहेत, अशा लोकांवर घेण्यात येणार आहे. दरम्यान, या कंपनीकडून दोन महिन्यांपूर्वी डुकराच्या मेंदूतही काम्प्युटर चिप बसवण्यात आली असून यामुळे अनेक प्रयोगांदरम्यान डुकराच्या मेंदूची परिस्थिती लाईव्ह पाहणे शक्य झाले.